मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमाचा पालकमंत्र्यांकडून आढावा

स्टेज, मंडप उभारणी अंतीम टप्प्यात
कार्यक्रमाची तयारी पुर्णत्वाकडे
लाडक्या बहिणीस मुख्यमंत्री देणार धनादेश

यवतमाळ, दि.22 (जिमाका) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत दि.24 ऑगस्ट रोजी सकाळी 11.30 वाजता किन्ही येथे आयोजित मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रमाच्या तयारीचा पालकमंत्री संजय राठोड यांनी आढावा घेतला. कार्यक्रमाची तयारी अंतीम टप्प्यात असून वेळेत सर्व कामे पुर्ण करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी केल्या.

बैठकीला पालकमंत्र्यांसह आ.मदन येरावार, आ.नामदेव ससाणे, जिल्हाधिकारी डॅा.पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, उपवनसंरक्षक धनंजय वायभासे, अतिरिक्त जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रकाश राऊत यांच्यासह कार्यक्रमाच्या नियोजनासाठी तयार करण्यात आलेल्या विविध समित्यांचे प्रमुख उपस्थित होते.

कार्यक्रमासाठी प्रशासनाने 50 हजार महिलांचे नियोजन केले आहे. महिलांची संख्या वाढल्यास त्यांची बसण्याची गैरसोय होऊ नये, यासाठी अतिरिक्त व्यवस्था तयार ठेवावी. महिलांना बसमध्येच खाद्य पदार्थ, पिण्याचे पाणी देण्यात यावे. प्रत्येक बसमध्ये समन्वयासाठी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात यावी. ठिकठिकाणाहून येणाऱ्या महिलांना पार्कींगपासून खुप लांब चालत जावे लागू नये, यासाठी पार्कींग मंडपाच्या जवळ आणि तालुकानिहाय करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी केल्या.

पावसाळ्याचे दिवस असल्याने पावसाचा अंदाज घेऊन व्यवस्था करण्यात यावी. भोजन, वाहतूक, पार्कींग, बसण्याची व्यवस्था, सुरक्षा, कार्यक्रमाच्या दिवशी वळण रस्ता आदींचा सविस्तर आढावा घेतला. जिल्ह्यात ठिकठिकाणाहून येणाऱ्या महिलांना एकसारखे आणि उत्तम दर्जाचे खाद्य पदार्थ देण्यात यावे. त्या दिवशी कडक उन्ह असल्यास पर्यायी व्यवस्था म्हणून कुलर, पंखे उपलब्ध ठेवण्याची सूचना आ.मदन येरावार यांनी केली.

यावेळी समिती प्रमुखांकडून त्यांच्या कामाचा आढावा घेण्यात आला. प्रत्येकाने आपआपल्यावर सोपविलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावे, कार्यक्रमात कोणत्याही प्रकारची गैरसोय, कमतरता राहू नये. यवतमाळ येथे आयोजित हा कार्यक्रम ईतर जिल्ह्याच्या तुलनेत सर्वोत्कृष्ट कसा होईल यासाठी प्रत्येकाने सामुहिकपणे काम करावे, असे पालकमंत्री श्री.राठोड यावेळी म्हणाले.

कार्यक्रमस्थळी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्याहस्ते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत पात्र महिलांना धनादेशाचे वितरण करण्यात येणार आहे. कार्यक्रमास महिलांसह सरपंच मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे.

000