नांदेड दि. १३ ऑक्टोंबर : मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान अंतर्गत आज नांदेड जिल्ह्यात विविध योजनांच्या लाभार्थ्यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान होणे हा एक अविस्मरणीय अनुभव असल्याच्या भावना लाभार्थ्यांनी यावेळी व्यक्त केल्या.
आज नांदेड येथील नवा मोंढा, कृषी उत्पन्न बाजार समिती मैदानावर महिला सशक्तीकरण अभियानातील नांदेड जिल्ह्यातील लाभार्थ्यांचा आनंद मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी मान्यवरांसह लाभार्थी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलेल्या निवडक सन्मानार्थी लाभार्थ्यांच्या अशा आहेत प्रतिक्रिया…
“मुलींना मोफत उच्च शिक्षण योजने”मुळे;
मुलीच्या पंखांना बळ…….
नांदेड जिल्ह्यातील शासकीय अध्यापक महाविद्यालय, ग्रामीण येथे बीएडच्या द्वितीय वर्षात शिकत असलेली कविता मोकळे विद्यार्थिनी सांगते की, पूर्वी मुलींना उच्च शिक्षणात 50 टक्के फी माफ होती. असे असूनही राहिलेली 50 टक्के फी भरणेही माझ्या शेतकरी आई वडिलांसाठी मोठे अडचणीचे होते. परंतू आत्ता शासनाने मुलींना उच्च शिक्षणात 100 टक्के फी माफ करून मुलींसाठी उच्च शिक्षण मोफत योजना सुरू केली. त्यामुळे मला आत्ता माझे शिक्षण पूर्ण करता येणार असून शिक्षिका होण्याचे माझे स्वप्न सत्यात उतरणार आहे.
या योजनेची लाभार्थी म्हणून माझा व माझ्या सहकारी विद्यार्थिनींचा मुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज सन्मानही झाला, हा सन्मान माझ्यासाठी खूप अविश्वसनीय आहे. मुलींना उच्च शिक्षणासाठी संपूर्ण फी माफ केल्याने कुटुंबातही मुलींना शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन मिळत आहे. तसेच या योजनेच्या माध्यमातून शासनाने मुलींना उच्च शिक्षण घेऊन आकाशात उंच भरारी घेण्यासाठी त्यांच्या पंखात बळ निर्माण केल्याची भावना ही कविताने बोलून दाखविली.
मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून
दिव्यांगही स्वतः च्या पायावर उभे
राज्यात मुख्यमंत्री युवाकार्य प्रशिक्षण योजनेतून उच्च शिक्षित तरुणांना रोजगार मिळत आहे. त्यातही नांदेड येथील आर.आर. मालपाणी मतिमंद आणि मूकबधीर विद्यालय व किनवट सारख्या आदिवासी भागातील निवासी मूकबधीर विद्यालयातील संगणक तज्ञ, आयटीआय, डीएड विद्यार्थ्यांना मिळालेला रोजगार विशेष आहे.
कारण मालपाणी विद्यालयातील अभिषेक शेळके, समिउल्ला खान आसर पठाण, प्रदीप लोंढे तर निवासी मूकबधीर विद्यालयातील अक्षय तकलवार हे विद्यार्थी कर्णबधीर, मूकबधीर असले तरी त्यांना आपल्या ज्ञानाच्या जोरावर मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेअंतर्गत रोजगाराची संधी मिळाली आहे. याआधी त्यांना कुठलाच रोजगार नव्हता, त्यामुळे या सर्व विद्यार्थ्यांतर्फे विद्यालयाचे प्राचार्य नितीन निर्मल यांनी शासनाचे आभार मानले आहे.
श्री.निर्मल यांच्या प्रतिक्रियेचे द्विभाषिक शिक्षक साईनाथ इप्तेकर यांनी मुलांच्या भाषेत भाषांतरित करूनही सांगितले. रोजगार मिळाल्याने स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा आनंद या मुलांच्या चेहऱ्यावर झळकत होता.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून
आदिवासी पाड्यावरील महिला झाल्या आर्थिक सक्षम
किनवट तालुक्यातील घोगरवाडी ग्रामपंचायत अंतर्गत शिवशक्तिनगर येथील पाड्यावर राहणाऱ्या जिजाबाई धुरवे व शशिकला आत्राम या 50 वर्षावरील वयाच्या आदिवासी महिलांनाही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला आहे. शेती आणि पशूपालन करणाऱ्या, स्वतःचे अर्जही भरता न येणाऱ्या या महिलांचे अंगणवाडी पर्यवेक्षिका चंद्रकला पोले यांनी परिपूर्ण अर्ज सादर केल्याने आजपर्यत 7 हजार 500 रू. चा लाभ त्यांना मिळाला आणि इतर महिलांनाही या योजनेचा लाभ मिळाल्याने गावातील महिलांमध्ये आर्थिक सक्षमता आल्याची भावना त्यांनी बोलून दाखवली. तसेच आज मुख्यमंत्र्यांच्या हस्तेही सन्मान होत असल्याने आनंद होत असल्याचे सांगत त्यांनी शासनाचे आभार मानले.
बचत गटातील महिला आर्थिक मदतीतून स्वयंपूर्ण
महिला आर्थिक विकास महामंडळ आणि बँकेमार्फत 10 महिला असलेल्या आम्रपाली बचत गटास सात लाखांचे कर्ज मंजूर झाले. त्यातून आम्ही बांधकाम साहित्य विकत घेऊन व्यवसाय सुरू केला. या व्यवसायातून आम्हाला चांगले उत्पन्नही मिळत आहे. आज मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या हस्ते आमचा सन्मानही झाला असून आम्हाला खूप आनंद होत असल्याच्या भावना आम्रपाली बचत गटातील लक्ष्मी धडेकर, चंद्रकला धडेकर यांनी व्यक्त केल्या.
लाडाची योजना लेक लाडकी
महिलांचे सक्षमीकरण करण्याचा मुख्य पाया म्हणजे मुलींच्या जन्मापासून त्यांचे आरोग्य, पोषण यांची काळजी घेणे. यासाठी मुख्यमंत्री लेक लाडकी योजना गरीब कुटुंबासाठी अत्यंत फायदेशीर ठरत आहे. नांदेड येथील पौर्णिमा दापशेंडे यांना 10 महिन्यापूर्वी मुलीच्या जन्मावेळी पाच हजार रूपयांचे अनुदान व बेबी किट चा लाभ देण्यात आला. तसेच संघमित्रा कांबळे यांनाही एक वर्षापूर्वी मुलीच्या जन्मावेळी पाच हजार रूपये व बेबी किट चा लाभ देण्यात आला. मुलींच्या जन्मावेळी लेक लाडकी योजनेचा लाभ मिळाल्याने मुलींची चांगल्या पध्दतीने काळजी घेता आली, असे त्यांनी यावेळी सांगत शासनाचे आभार मानले.
यावेळी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज सवलत योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजनेतील लाभार्थ्यांचाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते स्मृती चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आल्याने त्या सर्वांनी शासनाचे आभार मानले.
00000
The post मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान होणे अविस्मरणीय; आनंद मेळाव्यात लाभार्थ्यांच्या भावना first appeared on महासंवाद.