युवकांनी शास्त्रीय व लोकनृत्य परंपरांचे जतन करावे – मंत्री डॉ. भारती पवार

नाशिक दि. १३ (जिमाका): आपल्या देशाला विविध नाट्य, नृत्य परंपरा लाभल्या असून त्यामुळे देशाची जगात एक वेगळी ओळख आहे. या शास्त्रीय व लोकनृत्य परंपरेचे युवकांनी जतन करून त्या पुढे सुरू ठेवण्याचे आवाहन केंद्रीय आरोग्य, कुटुंब कल्याण तथा जनजातीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केले.

राष्ट्रीय युवा महोत्सवानिमित्त आज महाकवी कालिदास कलामंदिरात झालेल्या लोकनृत्य समुह व वैयक्तिक नृत्य कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांच्यासह राज्यातील विविध मान्यवर व युवक उपस्थित होते.

केंद्रीय राज्यमंत्री डॉ. पवार म्हणाल्या की, भारतीय नृत्यकला ही संपूर्ण जगात लोकप्रिय आहे. तसेच मानवी मनातील भावना कथा स्वरूपात नृत्यातून दाखवण्याची कला शास्त्रीय व लोकनृत्यात आहे. शास्त्रीय नृत्यात भरतनाट्यम, कथ्थक, मोहिनीअट्टम, कुचीपुडी, कथकली, ओडिसी, मणिपुरी, सत्रिय अशा या आठ महत्त्वाच्या शास्त्रीय नृत्याचे प्रकार देशात विविध राज्यात प्रसिद्ध आहेत. शास्त्रीय व लोकनृत्य ही दोन्ही नृत्य भारतीय संस्कृती, परंपरेचं दर्शन घडवित असतात. युवा महोत्सवासाठी आलेल्या विविध राज्यातील युवकांनी नाशिकमधील पर्यटन व खाद्य संस्कृतीचा आस्वाद घ्यावा, असे आवाहनही मंत्री डॉ. पवार यांनी यावेळी केले.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी विविध राज्यातील शास्त्रीय व लोकनृत्यांचे सामूहिक व वैयक्तिक नृत्य प्रकार सादर करण्यात आले.

०००

खाद्य महोत्सवात विविध प्रांतातील खाद्यपदार्थ एकाच छताखाली

केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री निसिथ प्रामाणिक यांनी घेतला कर्नाटकी गुळपोळीचा स्वाद

नाशिक दि. १३ (जिमाका): राष्ट्रीय युवा महोत्सवात आज दुसऱ्या दिवशी विविध  कार्यक्रमांनी सुरुवात झाली. पंचवटीतील हनुमान नगरातील युवाग्राममध्ये आयोजित खाद्य महोत्सवाकडे नाशिककरांची पावले वळत आहेत. वेगवेगळ्या प्रांतातील खाद्यपदार्थांची चव घेण्याची संधी एकाच छताखाली मिळत असल्याने खाद्य महोत्सव हा या महोत्सवातील आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. अशा चविष्ट पदार्थांचा आस्वाद घेण्याचा मोह केंद्रीय राज्यमंत्री निसिथ प्रामाणिक यांनाही झाला व त्यांनी यावेळी कर्नाटकी गुळपोळीचा आस्वाद घेतला.

खाद्य महोत्सवात घ्या या पदार्थांचा आस्वाद

राष्ट्रीय युवा महोत्सवानिमित्त हनुमान नगर परिसरात खाद्य महोत्सव भरवला आहे. महोत्सवात महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, पंजाब, मध्य प्रदेश, आसाम, गुजरात यांसह वेगवेगळ्या भागातील खाद्यपदार्थ या ठिकाणी ठेवण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील केळी वेफर्स, वडापाव, वेगवेगळ्या प्रकारच्या मिसळ यासह चमचमीत, तर्रीदार कोल्हापुरी उसळसह दक्षिण भारतातील इडली, डोसा, मेदुवडा, कर्नाटकी गुळपोळी असे वेगवेगळे खाद्यपदार्थ नाशिककरांना आकर्षित करत आहेत. पौष्टिक तृणधान्य वर्ष साजरे केले जात असल्याने देशपातळीवर तृणधान्यविषयक पाककला स्पर्धेतील विजेत्यांच्या पाककृती, पदार्थ या ठिकाणी ठेवण्यात आले आहेत.

०००

लोकगीतांनी घडविले लोकसंस्कृतीचे दर्शन; पारंपरिक लोकगीतांच्या श्रवणीय सादरीकरणाने रंगत

नाशिक दि. १३ (जिमाका): राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी विविध राज्यांच्या कलाकारांनी सादर केलेल्या श्रवणीय लोकगीतांनी महोत्सवात रंगत आणली. या लोकगीतांतून विविध राज्यातील लोकसंस्कृती, परंपरांचे प्रेक्षकांना दर्शन घडविले.

२७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवात आज रावसाहेब थोरात सभागृहात विविध राज्यातील कलाकारांच्या लोकगीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. लोकगीत कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार प्रा. देवयानी फरांदे यांच्या हस्ते झाले.

कर्नाटक, महाराष्ट्र, झारखंड, हरियाणा, छत्तीसगड, दिल्ली, गुजरात आणि गोवा‌ राज्यातील कलाकारांनी लोकगीते सादर केली‌. प्रत्येक राज्यातील कलाकारांनी आपल्या पारंपरिक गीते, संगीत, सुरांद्वारे श्रवणीय, नादरम्य लोकगीते सादर केली‌. महादेवाच्या अलौकिक शक्तीचे महत्त्व विशद करणारे कर्नाटकचे लोकगीत, महाराष्ट्राच्या कृषी संस्कृतीचे दर्शन घडविणारे लोकगीत, झारखंडच्या दारूच्या व्यसनावर मार्मिक भाष्य करणारं, लडाखच्या कलाकारांच्या भावस्पर्शी सुरांनी गाव आणि आईच्या प्रेमाची तळमळ‌ व्यक्त करणारे, हरियाणाच्या कलाकारांनी‌ सकस अभिनयासह सादर केले. लोकगीते आणि छत्तीसगडच्या प्राचीन परंपरांचे दर्शन घडविणाऱ्या लोकगीतांनी उपस्थितांना अवर्णनीय आनंद दिला.

स्पर्धा स्वरूपात सादर झालेल्या आजच्या सांघिक व वैयक्तिक लोकगीत कार्यक्रमांचे परीक्षक म्हणून डॉ. रंजना सरकार, डॉ. टी.व्ही. मणिकंदन आणि ओंकार वैरेगकर यांनी काम पाहिले. नेहरू युवा केंद्राचे पंजाब राज्याचे संचालक परमजीत सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक संचालक सूर्यकांत कुमार, धुळे जिल्हा युवा अधिकारी अविनाश आणि रेश्मा चंद्रन यांनी या कार्यक्रमाचे यशस्वी संयोजन‌ केले.”लोकगीतांचा कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला, तसा तो केवळ संगीताचा उत्सवच राहिला नाही तर भारताच्या लोकसंस्कृती, परंपरा व‌ एकात्मतेचे दर्शन घडविणारा ठरला.” अशी भावना परमजित सिंग यांनी ‌व्यक्त केली.

०००