रक्षाबंधनानिमित्त बहिणींना मिळाली उत्कृष्ट भेट – पालकमंत्री अतुल सावे

मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेतंर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यावर नियमितपणे जमा होणार रक्कम
मुख्यमंत्री –माझी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ कार्यक्रम संपन्न

जालना, दि. १७ (जिमाका) : महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी  शासनाने मुख्यमंत्री –माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून जालना जिल्हयातील पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यावर रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. रक्षाबंधनाच्या निमित्ताने शासनाकडून महिलांना मिळालेली ही उत्कृष्ट भेट आहे. यापुढेही नियमितपणे या योजनेच्या माध्यमातून महिलांना रक्कम मिळणार आहे, त्यामुळे महिलांनी अजिबात काळजी करु नये, अशी ग्वाही गृहनिर्माण, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी दिली.

मुख्यमंत्री –माझी लाडकी बहीण योजनेचा राज्यस्तरीय शुभारंभ कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुणे येथे पार पडला. या निमित्ताने या कार्यक्रमाचे थेट प्रसारण आणि लाभार्थी महिला, उत्कृष्ट काम करणाऱ्या पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका यांचा सत्कार समारंभ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल भवनात आयोजित करण्यात आला होता. यावेळी पालकमंत्री बोलत होते.

कार्यक्रमास आमदार नारायण कुचे, माजी मंत्री अर्जुन खोतकर, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, अतिरिक्त पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, जालना महापालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी नवनाथ वामन, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बाल विकास ) कोमल कोरे आदींसह पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका आणि लाभार्थी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

पालकमंत्री श्री. सावे म्हणाले की, जालना जिल्हयात मुख्यमंत्री –माझी लाडकी बहीण योजनेची जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषदेसह सर्व संबंधित विभागंनी अतिशय प्रभावीपणे अंमलबजावणी केल्यामुळे  ही योजना यशस्वी झाली आहे. अगदी कमी कालावधीत सर्व आव्हानांवर मात करीत समन्वय व सकारात्मकतेमुळे आपला जिल्हा ही योजना प्रभावीपणे राबवू शकला. या योजनेमुळे सर्वसामान्य महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.

आमदार श्री. कुचे यांनी  मुख्यमंत्री –माझी लाडकी बहीण योजनेबद्दल मुख्यमंत्री यांचे आभार मानले. सर्वसामान्य महिलांना अर्थिक सक्षम करणारी ही योजना असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ यांनी जालना जिल्हयात या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी करण्यात आलेल्या कार्याबद्दल माहिती दिली. ते म्हणाले की, समाज आणि देशाची प्रगती ही  महिलांवरच अवलंबून असते. मुख्यमंत्री –माझी लाडकी बहीण योजनेमुळे महिला अर्थिकदृष्टया सक्षम होण्यास मदत होणार आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी  सर्वांनी चांगले सहकार्य केले.

मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मीना म्हणाल्या की, मुख्यमंत्री –माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना रक्षाबंधनाची एक चांगली भेट मिळाली आहे. ही अतिशय आनंदाची बाब आहे.

यावेळी काही लाभार्थी महिलांनी प्रातिनिधीक स्वरुपात आपले मनोगत व्यक्त केले. गोंदेगाव येथील मीरा वाघ म्हणाल्या की, शासनाचे आम्ही खूप आभारी आहोत. मुख्यमंत्री –माझी लाडकी बहीण योजना ही खूप चांगली योजना आहे. रक्षाबंधनाची आम्हाला चांगली ओवळणी मिळाली आहे. तर नंदा खंदारे म्हणाल्या की, या योजनेमुळे आम्हाला खूप आनंद झाला. मुख्यमंत्री दादा आम्ही तुमचे आभारी आहोत. स्वप्नातसुध्दा आम्हाला वाटले नाही की, अशा योजनेतून चांगला आर्थिक लाभ मिळेल.

प्रास्ताविक श्री. वामन यांनी केले. यावेळी प्रातिनिधिक स्वरुपात लाभार्थी महिलांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. योजनेच्या यशस्वी अंमलबजवणीबद्दल उत्कृष्ट काम करणाऱ्या पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका यांचाही गौरव करण्यात आला.

०००

मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना 

लाभार्थी महिलांनी मानले मुख्यमंत्री यांचे आभार
बहिणींच्या खात्यावर जमा झाले 3 हजार रुपये
रक्षाबंधनाची मिळाली ओवळणी

जालना, दि. १७ (जिमाका) :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शब्द दिल्याप्रमाणे मुख्यमंत्री -माझी लाडकी बहीण योजनेतंर्गत माझ्या खात्यात तीन हजार रुपये जमा झाले. रक्षाबंधना आधीच मुख्यमंत्री भावाकडून ओवाळणी मिळाली, त्यांच्यासाठी मी राखी घेवून आले आहे. त्यांच्या सहकार्याने आमचा आनंद गगनात मावेना.  शेतात, वाडी, वस्त्यांवर सगळीकडे साऱ्या महिलांच्या तोंडात फक्त मुख्यमंत्री दादांचे नाव आहे, असे उदगार गोंदेगाव येथील नंदा अशोक खंदारे यांनी काढले.

जालना जिल्ह्यात मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजनेतंर्गत पात्र लाभार्थी महिलांच्या बॅंक खात्यात जुलै व ऑगस्ट महिन्यांचे तीन हजार रुपये दोन दिवसांपासूनच जमा होत होते. पैसे जमा झाल्याचे संदेश मोबाईलवर पाहुन महिलांच्या आनंदाला पारावार उरला नाही. यानिमित्ताने जालना जिल्ह्यातील लाभार्थी महिलांशी संपर्क साधला असता त्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया अत्यंत बोलक्या होत्या. जिल्हयातील वर्षा कपिल करपे (मोदीखाना जालना), ज्योती विजय दळवी (कन्हैय्यानगर जालना), सविता कुऱ्हाडे (काजळा),  मंगल बाबुराव भिंगारे (दाढेगाव ता.अंबड), मंगल रामभाऊ बोडखे (चुरमापुरी ता.अंबड), उषा सुधाकर मोरे (शिवनगाव ता.घनसावंगी), प्रतिभा किशोर आपार (नुतन वसाहत जालना), मिरा गजानन वाघ (गोंदेगाव), नंदा अशोक खंदारे (गोंदेगाव) या काही बहिणींचे मनोगत जाणून घेतले असता, त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

आमची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने माझ्या घर खर्चासाठी  हे तीन हजार रुपये खूप उपयोगी पडणार आहेत. तसेच एका महिलेने माझ्या मुलांच्या शिक्षणासाठी व व्यवसायासाठी या पैशाचा उपयोग करणार असल्याची भावनाही बोलून दाखविली. आपल्या भावाने पाठवलेली ही रक्षाबंधनाची ओवाळणी म्हणून हा पैसा निव्वळ योजनेचा लाभ न राहता त्याला एक वेगळे भावनिक परिमाण लाभले आहे, असे या बहिणींच्या मनोगतातून स्पष्ट होते. कुणाला आपल्या संसाराला हातभार लाभल्याचे अप्रुप होते तर कुणाला आपल्या हक्काचे पैसे मिळाल्याचा आनंद होता. भावाने दिलेला शब्द पाळला अशीही भावना व्यक्त करत पदोपदी आभार व धन्यवाद हे वाक्य प्रत्येक महिलेच्या तोंडून ऐकावयास मिळाले. एकंदर महिलांच्या जीवनात या योजनेमुळे बदल होऊन त्यांच्यात आत्मविश्वास बळावलेला दिसला. आपल्याला हक्काचे पैसे मिळाल्याचा आनंद या महिलांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.

०००