रत्नागिरी जिल्ह्यातील ‘कर्दे’ला कृषी पर्यटनासाठीचा सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव पुरस्कार प्रदान

मुंबई, दि.२८: महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील कर्दे गावाला कृषी पर्यटन श्रेणीत सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव पुरस्कार २०२४ प्रदान करण्यात आला आहे. भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने जागतिक पर्यटन दिनानिमित्त या प्रतिष्ठित पुरस्काराची घोषणा केली होती. पर्यटन संचालनालयाचे सह संचालक स्वप्निल कापडणीस, सरपंच सचिन तोडणकर, उपसरपंच दत्ताराम भुवड, कृषी अधिकारी सुनील खरात यांनी हा पुरस्कार दिल्ली येथे स्वीकारला. या स्पर्धेत यश मिळवल्याबद्दल पर्यटन मंत्री गिरीश महाजन, पर्यटन सचिव जयश्री भोज, पर्यटन संचालक डॉ.बी. एन. पाटील यांनी अभिनंदन केले आहे.

या स्पर्धेत सहभागी झालेल्या ३० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील ९९१ गावांपैकी आठ वेगवेगळ्या श्रेणींमध्ये ३६ गावांची विजेते म्हणून निवड करण्यात आली होती. महाराष्ट्रातील १२६ ग्रामपंचायतीनी यामध्ये सहभाग घेतला होता. स्थानिक अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या कृषी पर्यटनाला चालना देण्याच्या प्रयत्नांसाठी कर्दे गावाला मान्यता मिळाली.

रत्नागिरीच्या किनारपट्टीवर वसलेले कर्दे हे गाव स्वच्छ समुद्रकिनारे, पांढरी वाळू आणि नयनरम्य परिसर यामुळे पर्यटकांना आकर्षित करत आहे. हा पुरस्कार महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे आणि यामुळे राज्याच्या पर्यटन विकासाला चालना मिळेल अशी अपेक्षा आहे.

२०२३ मध्ये सुरू झालेल्या या स्पर्धेचा उद्देश ग्रामीण पर्यटनाला चालना देणे आणि त्या भागातील पर्यटनाच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या गावांच्या प्रयत्नांना मान्यता देणे हा आहे. कृषी पर्यटन, महिला सक्षमीकरण आणि शाश्वत विकासासाठीच्या नाविन्यपूर्ण दृष्टीकोनांसाठी कर्दे गावाची निवड करण्यात आली आहे. गावाने पर्यावरणीय पर्यटनाला चालना देण्यासाठी नैसर्गिक संसाधनांचा वापर, जल व्यवस्थापन आणि कचरा व्यवस्थापन यासह विविध उपक्रम राबवले आहेत.

शाश्वत पर्यटनाला चालना देण्याच्या गावाच्या प्रयत्नांची आणि स्थानिक पर्यावरण आणि संस्कृती जतन करण्याच्या त्याच्या वचनबद्धतेची मान्यता म्हणून हा पुरस्कार दिला जातो.

०००