मुंबई, दि.१३ : किराणा घराण्याच्या ज्येष्ठ शास्त्रीय संगीत गायिका पद्मविभूषण डॉ. प्रभा अत्रे यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आणि वेदनादायी आहे. डॉ. प्रभा अत्रे यांनी शास्त्रीय गायनातून देशभरातील रसिक नुसता मंत्रमुग्ध केला नाही, तर तो अधिक समृद्ध केला. ठराविक पठडीच्या बाहेर जाऊन गायनासाठी त्या ओळखल्या जात. नाविन्य हे त्यांच्या गायनशैलीचे वैशिष्ट्य होते. त्यांच्या स्वरांना तप:श्चर्येचे बळ होते. अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. अत्रे यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस शोकसंदेशात म्हणतात की, केवळ गायन नाही तर आपले रसिक जाणकार असावेत, यासाठी त्यांनी लेखन देखील केले. त्यांच्या संगीत सेवेसाठी त्यांना भारत सरकारने ‘पद्मश्री’, ‘पद्मभूषण’ आणि ‘पद्मविभूषण’ अशा तिन्ही पुरस्कारांनी गौरविले आहे.
गेल्याच महिन्यात २५ डिसेंबर २०२३ रोजी पुण्यात त्यांना अटल संस्कृती पुरस्कार प्रदान सोहळ्यातील त्यांची शेवटची भेट ठरेल, अशी कल्पनाही नव्हती. त्यांना भेटणं, त्यांचं गाणं ऐकणं ही कायम विलक्षण अनुभूती असायची. भारतीय शास्त्रीय संगीताला त्यांनी दिलेले योगदान शब्दात मांडणे अशक्य आहे. प्रभाताईंनी भारतीय शास्त्रीय संगीताची सेवा करताना नव्या गायक-गायिकांना घडविण्याचे कार्य केले. भारतीय संगीत त्यांचे कायम ऋणी राहील.
मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. हे दुःख सहन करण्याची शक्ती त्यांचे कुटुंबीय, आप्तस्वकीय आणि चाहत्यांना लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.
०००