राज्यभरात ‘घरोघरी तिरंगा’ अभियान राबविणार – अपर मुख्य सचिव विकास खारगे

मुंबई, दि. 6: देशभरात 13 ते 15 ऑगस्टदरम्यान ‘हर घर तिरंगा’ अर्थात ‘घरोघरी तिरंगा’ अभियान राबविले जाणार आहे. यासाठी महाराष्ट्र राज्यानेही पूर्ण तयारी केली असून राज्यात 9 ते 15 ऑगस्ट या कालावधीत सर्वत्र विविध उपक्रमांनी हे अभियान साजरे केले जाईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी दिली.

आज केंद्रीय सांस्कृतिक कार्य मंत्रालयाच्या वतीने सर्व राज्यांच्या सांस्कृतिक कार्य विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक झाली. त्यावेळी अपर मुख्य सचिव श्री. खारगे यांनी ही माहिती दिली. यावेळी ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव के. गोविंदराज यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

SPK DGIPR Mantralay Mumbai

केंद्र शासनाने सन 2022 पासून हर घर तिरंगा (घरोघऱी तिरंगा )अभियान सुरु केले. यावर्षी या अभियानाचे हे तिसरे वर्ष आहे. मागील दोन्ही वर्षी या अभियानात महाराष्ट्र राज्याने विविध उपक्रम राबवून आघाडी घेतली. यावर्षीही तिरंगा रॅली, तिरंगा यात्रा, तिरंगा मॅरेथॉन, तिरंगा कॉन्सर्ट, तिरंगा कॅनव्हास, तिरंगा प्रतिज्ञा, तिरंगा सेल्फी, तिरंगा ट्रीब्यूट असे विविध उपक्रम राबविण्याबाबत केंद्र सरकारने सूचना दिल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्याने केलेल्या तयारीची माहितीही श्री. खारगे यांनी यावेळी दिली.

प्रत्येक नागरिकाने घरावर तिरंगा ध्वज दिनांक 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत फडकवावा, यासाठी त्यांना राष्ट्रध्वज उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. राज्यभरात विविध शाळा, महाविद्यालये, विविध सामाजिक संस्था, महिला बचत गट तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून हे अभियान राबविले जाणार आहे. गावपातळीपासून ते जिल्हापातळीपर्यंत तसेच राज्यस्तरावरही यानिमित्त रॅली, स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान, राष्ट्रध्वजासोबत सेल्फी, प्रतिज्ञावाचन असे विविध उपक्रम घेतले जाणार आहेत. नागरिकांच्या अधिकाधिक सहभागाने हे अभियान निश्चितपणे यशस्वी करु, असे अपर मुख्य सचिव श्री. खारगे यांनी यावेळी सांगितले.

000

दीपक चव्हाण/विसंअ