राज्यस्तरीय कृषी महोत्सवास एक दिवस मुदतवाढ – कृषिमंत्री धनंजय मुंडे

आता २६ ऑगस्ट रोजी समारोप

मुंबई, दि.24 : परळी वैजनाथ, जिल्हा- बीड येथे राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचे दि. २१ ते २५ ऑगस्ट २०२४ दरम्यान आयोजन करण्यात आलेले आहे. कृषी महोत्सवास राज्यातील शेतकरी बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता या प्रदर्शनाचा कालावधी एक दिवस वाढवण्यात येत आहे. त्यामुळे या कृषी महोत्सवाचा समारोप दि. २५ ऑगस्ट ऐवजी २६ ऑगस्ट २०२४ रोजी करण्यात येईल.  सर्व शेतकरी बांधवांनी याची नोंद घ्यावी व या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे.

या महोत्सवामध्ये कृषी निविष्ठा, कृषी अवजारे, सिंचन साधने, संरक्षित शेती साधने, महिला गट, बचत गट, शेतकरी उत्पादक कंपन्या इत्यादींच्या उत्पादित वस्तू, खाद्यपदार्थ यांचे प्रदर्शन व विक्री साठी ४०० हून अधिक स्टॉल प्रदर्शित करण्यात आलेले आहेत. याशिवाय कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र, कृषी विभाग, महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत कृषी विभागाचे नाविन्यपूर्ण उपक्रम, झालेले संशोधन यांची देखील माहिती या महोत्सवामध्ये शेतकऱ्यांना देण्यात येत आहे. दररोज शेतकऱ्यांसाठी चर्चासत्राचे आयोजन केलेले आहे. तसेच रानभाजी महोत्सवाचे आयोजन देखील करण्यात आलेले आहे.

 

000000