मुंबई, दि. ६ – राज्यात महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महसंघामार्फत खरेदी करण्यात येणाऱ्या रब्बी ज्वारी खरेदीसाठी दि. ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याचे पणन महासंघाने कळविले आहे.
शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत रब्बी पणन हंगाम २०२३-२४ मध्ये बिगर आदिवासी क्षेत्रात धान व भरडधान्य (मका, ज्वारी व रागी) खरेदीसाठी पणन महासंघाची मुख्य खरेदी संस्था म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. रब्बी ज्वारी खरेदीसाठी पणन महासंघास ८ लाख २० हजार क्विंटल खरेदीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. हे उद्दिष्ट पूर्ण न झाल्याने तसेच नोंदणीकृत शेतकऱ्यांकडील रब्बी ज्वारी शिल्लक राहिल्याने शासनाने शिल्लक राहिलेल्या शेतकऱ्यांकडील ज्वारी खरेदीसाठी दि. ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे.
तसेच अमरावती जिल्ह्यासाठी ज्वारी खरेदीचे ८५ हजार क्विंटलचे वाढीव उद्दिष्ट देण्यात आले आहे. राज्यातील ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे, पण त्यांची ज्वारी अजून खरेदी झालेली नाही, अशा शेतकऱ्यांनी दिलेल्या मुदतीत त्यांची ज्वारी पणन महासंघाच्या केंद्रावर विक्रीसाठी आणावी. राज्यातील ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाने केले आहे.
०००००
हेमंतकुमार चव्हाण/विसंअ