राज्य संरक्षित स्मारक परिसरात विनापरवानगी जाहिरात अथवा चित्रीकरणास प्रतिबंध – संचालक डॉ. तेजस गर्गे 

मुंबई, दि. १९ : गेटवे ऑफ इंडिया, मुंबई हे राज्य संरक्षित स्मारक महाराष्ट्र प्राचीन स्मारके व पुराणवस्तू शास्त्र विषयक स्थळे व अवशेष अधिनियम, १९६० अन्वये राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले आहे. अधिनियमातील तरतुदीनुसार राज्य संरक्षित स्मारक परिसरात कोणतीही जाहिरात करण्याअगोदर त्याचप्रमाणे कोणताही कार्यक्रम अथवा चित्रीकरण करण्याकरिता संचालनालयाची विहीत पद्धतीने लेखी परवानगी प्राप्त करणे आवश्यक आहे, अशी माहिती पुरातत्व व वस्तूसंग्रहालये संचालनालयाचे संचालक डॉ. तेजस गर्गे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

एका कंपनीने विनापरवानगी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर गेट वे ऑफ इंडिया, मुंबई या राज्य संरक्षित स्मारकावर त्यांच्या कंपनीच्या शीतपेयाची प्रतिकृती झळकत असल्याची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यासाठीच्या चित्रीकरण अथवा कार्यक्रमाकरिता संचालनालयामार्फत त्यांना कोणतीही परवानगी निर्गमित केलेली नाही. त्याचप्रमाणे व्यावसायिक जाहिरातीकरिता राज्य संरक्षित स्मारकांचा वापर करण्यास मनाई आहे. त्यामुळे तत्काळ ही जाहिरात हटवण्याच्या सूचना दिल्याचे डॉ. गर्गे यांनी पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

कंपनीच्या अधिकृत इंस्टाग्राम समाजमाध्यमावरील जाहिरात संकेतस्थळावरून काढण्यात यावी. विनापरवानगी अनधिकृतपणे जाहिरात प्रसिद्ध केल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करावी, पुरातत्व व वस्तूसंग्रहालयांचा जाहिरातीसाठी अनधिकृतपणे वापर करण्यात येणार नाही, असे प्रसिद्ध करण्यात यावे आणि तसे संचालनालयास लेखी कळविण्यात यावे, असे कंपनीला दिलेल्या पत्रात कळविण्यात आल्याचे त्यांनी या पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

या अनुषंगाने योग्य  दखल घेतली गेली नाही तर कारवाई करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

०००

दीपक चव्हाण/विसंअ/