रानभाज्यांची नवीन पिढीला ओळख होण्यासाठी जगजागृती आवश्यक – पालकमंत्री गिरीश महाजन

बदलत्या जीवनशैलीत रानभाज्यांचे महत्त्व अनन्यसाधारण
जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाचे उद्धाटन

धुळे, दि. १६  (जिमाका) : मानवी आहारात रानभाज्याचे अनन्य साधारण महत्त्व असून या रानभाज्या पावसाळ्यातील दिवसातच येत असून त्यांच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. यामुळे रानभाज्यांची नवीन पिढीला ओळख होण्यासाठी जनजागृती आवश्यक असल्याचे प्रतिपादन ग्रामविकास, पंचायत राज व पर्यटन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सव उद्धाटनप्रसंगी केले.

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, धुळे, प्रकल्प संचालक आत्मा, कृषि विज्ञान केंद्र, धुळे व स्वामी समर्थ सेवा केंद्र, धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.  यावेळी खासदार डॉ. शोभा बच्छाव, आमदार कुणाल पाटील, मंजुळा गावित, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कैलास शिरसाठ, प्रकल्प संचालक (आत्मा) नवनाथ कोळपकर, कृषि विज्ञान केंद्राचे समन्वयक दिनेश नांदे, डॉ. पंकज पाटील, उपप्रकल्प संचालक हितेंद्र सोनवणे, स्मार्ट प्रकल्पाचे नोडल अधिकारी विनय बोरसे, तालुका कृषि अधिकारी वाल्मिक प्रकाश, संजय पवार, शीतल तवर, योगेश सोनवणे याचेसह कृषि विभागाचे सर्व अधिकारी, आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक व सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. महाजन म्हणाले की, रानभाज्यांचे जतन व नवपिढीला त्यांची ओळख होण्याच्या दृष्टीने जनजागरण मोहिम राबविणे, प्रदर्शन भरवणे तसेच रानभाजी महोत्सव राबविणे ही काळाची गरज निर्माण झाली आहे. आदिवासी भागामध्ये पावसाळ्यात जंगलातच रानभाज्या मिळतात त्यामुळे त्यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. प्रत्येक भाजीच्या मागे एक शास्त्र असून प्रत्येक रानभाजी मानवी शरीराला लाभदायक असते. आजकालच्या फास्टफूडच्या जगात आपण पूर्वीच्या रानभाज्या विसरत चाललो आहे. अलीकडच्या काळात बाजारपेठेत भाज्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. भाजी उत्पादनात वाढ करण्यासाठी अमर्यादीत प्रमाणात रासायनिक खतांचा, रासायनिक द्रव्यांचा वापर होत आहे. यामुळे त्यांची नैसर्गीक चव व माणसातील रोग प्रतिकार शक्ती कमी होत आहे. पावसाळ्यात जंगलात आणि पहाडी भागात मोठ्या प्रमाणावर कंद व हिरव्या रानभाज्या उपलब्ध होतात. या भाज्यांची सर्वसामान्य लोकांमध्ये माहिती होण्यासाठी तसेच त्यांच्यात असलेल्या विविध औषधी गुणधर्माची ओळख होणे गरजेचे आहे. रानभाजी वनस्पतीपासून विविध पदार्थ बनविता येतात व ते आहारात वापरता येतात, यापैकी बऱ्याचशा वनस्पती ह्या मधूमेह, खोकला, पोटदुखी आदींवर औषधी म्हणून तर काही वनस्पती गर्भवती महिला व बाळांसाठी अतिशय उपयुक्त ठरल्या आहे. काळाच्या ओघात परिसरातील रानभाज्या नष्ट होत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी पालकमंत्री श्री. महाजन यांनी रानभाज्याचा आस्वादही घेतला.

यावेळी पालकमंत्री श्री. महाजन यांच्या हस्ते रानभाज्यांची मांडणी केलेल्या शेतकऱ्यांना प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले. तसेच रानभाज्या विषयक उपयुक्त माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. स्वामी समर्थ सेवा केंद्र, शिवाजीरोड येथील बापूसाहेब सोनवणे, महेंद्र सुर्यवंशी, शांताराम देसले, कल्याण सिसोदे, भैय्या शिंपी यांचे कार्यक्रम यशस्वीतेसाठी बहुमोल सहकार्य लाभले. कृषिभूषण शेतकरी दिलीप पाटील, वाल्मिक पाटील, प्रकाश पाटील, उद्यानपंडीत विजय चांडक,माजी महापौर प्रतिभाताई चौधरी,अनुप अग्रवाल,कमलाकर अहिरराव, नागरीक उपस्थित होते.

 

०००