राष्ट्रीय मागासवर्ग आयोगातर्फे प्राप्त निवेदनाच्या अनुषंगाने सुनावणी

मुंबई, ‍‍दि. २६ : राष्ट्रीय आरक्षण सूचीमध्ये समाविष्ट होण्यासाठी महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडे प्राप्त निवेदनाच्या अनुषंगाने राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे सुनावणी घेण्यात आली.

यावेळी राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे सदस्य भुवन भूषण कमल, सचिव आशिष उपाध्याय, सल्लागार राजेशकुमार, इतर मागास बहुजन कल्याण  विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद-सिंगल, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव सुमंत भांगे यांच्यासह विविध जाती समुहाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

राज्यातील लोध, लोधा, लोधी, बडगुजर, वीरशैव लिंगायत, सलमानी, किराड, भोयर पवार, सूर्यवंशी गुजर, बेलदार, झाडे, झाडे कुणबी, डांगरी, निषाद मल्ला, कुलवंतवाणी, कराडी, शेगर, नेवेवाणी, कानोडी, कानडी या जाती समूहाचा राष्ट्रीय मागासवर्ग यादीत समावेश करण्याबाबत आयोगाकडे निवेदन प्राप्त झाली आहेत. त्या अनुषंगाने या सुनावणीचे आयोजन आज करण्यात आले होते. या बैठकीत प्राप्त निवेदनाच्या अनुषंगाने पुढील कार्यवाही करण्यासंदर्भात आयोगाचे अध्यक्ष श्री.अहीर यांनी यावेळी संबंधितांना निर्देश दिले.

०००

शैलजा पाटील/विसंअ/