राष्ट्रीय युवा महोत्सव सर्वांच्या सहभागाने यशस्वी करावा : केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार

नाशिक, दि. 3 जानेवारी (जिमाका वृत्तसेवा) : राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी नाशिकची निवड ही अभिमानाची बाब असून हा महोत्सव यशस्वी करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. त्यामुळे या महोत्सवाचे समन्वयाने सूक्ष्म नियोजन करून हा महोत्सव सर्वांच्या सहभागाने यशस्वी करावा, अशा सूचना केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण तथा आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिल्या.

नाशिक येथे 12 ते 16 जानेवारी दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या नियोजनाबाबत जिल्‍हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार बोलत होत्या. यावेळी क्रीडा विभागाचे आयुक्त सुहास धिवसे दुरदृष्यप्राणालीद्वारे तर  जिल्हाधिकारी जलज शर्मा, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, महानगरपालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, मनपाचे शहर अभियंता शिवकुमार वंजारी, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, उपजिल्हाधिकारी भिमराज दराडे, क्रीडा उपसंचालक रविंद्र नाईक, जिल्हा क्रिडा अधिकारी सुनंदा पाटील (नाशिक), अविनाश टिळे (धुळे) यांच्यासह महोत्सव समिती व उपसमितीचे सदस्य उपस्थित होते.

केंद्रीय राज्यमंत्री डॉ. पवार म्हणाल्या की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन 12 जानेवारी रोजी तपोवन मैदानावर होणार आहे. त्यामुळे तेथील आवश्यक सर्व सोयी सुविधांचे नियोजन करण्यात यावे. तसेच प्रधानमंत्री यांच्या स्वागतासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या रोड शो चे सूक्ष्म नियोजन करण्यात यावे. तसेच कार्यक्रमाच्या वेळी व्यासपीठावरील आसन व्यवस्था, ग्रीनरूम मधील सुविधा तसेच भोजन व्यवस्था, निवास व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, स्वच्छता गृह याबाबत आढावा घेण्यात आला. यासोबतच या महोत्सवानिमित्त मॉनिटरिंग करणारे महत्वाच्या अधिकारी व संबंधित व्यक्तींचा व्हाट्सअप ग्रुप तयार करण्याच्या सूचनाही यावेळी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिल्या.

27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन 12 ते 16 जानेवारी 2024 या कालावधीत नाशिक येथे होणार असून या महोत्सवात 28 राज्ये व 8 केंद्रशासित प्रदेशामधील युवा चमू, राष्ट्रीय सेवा योजना, नेहरु युवा केंद्र संघटना यांचे स्वयंसेवक, परिक्षक व इतर मंत्रालय अधिकारी व कर्मचारी असे साधारण आठ हजार युवक सहभागी होणार आहेत. या सर्वांना ओळखपत्र किंवा ड्रेस कोड बाबत यावेळी चर्चा करण्यात आली.

दूरदृष्यप्राणालीद्वारे उपस्थित क्रीडा आयुक्त श्री. धिवसे यांनी माहिती देतांना सांगितले की, महोत्सवाच्या आयोजनासाठी विविध समित्या नियुक्त करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती, मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय कार्यकारी समिती, विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली आयोजन समिती गठीत करण्यात आली आहे. १२ जानेवारीला या महोत्सवाचे नाशिक येथील तपोवन मैदानावर उद्घाटन समारंभ होणार आहे. महोत्सवांतर्गत आयोजित करण्यात आलेले सांस्कृतिक कार्यक्रम निलगिरी मैदानावर होणार असून स्पर्धात्मक कार्यक्रमांसाठी स्वतंत्र सभागृहांचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती श्री. धिवसे यांनी दिली.

या बैठकी दरम्यान केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी विकसित भारत संकल्प यात्रा, ड्राय पोर्ट व आयुष्मान रुग्णालय यांच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला.

00000000