राष्ट्रीय युवा महोत्सव -२०२४ : तरूणांचे सामर्थ्य, एकता, देशातील विविधतेने नटलेल्या संस्कृतीचे पारंपरिक खेळांमधून दर्शन

नाशिक, दि. 14 जानेवारी, 2024 (जिमाका वृत्तसेवा) – नाशिक येथे सुरू असलेल्या 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवात आज तिसऱ्या दिवशी शहरातील महायुवा ग्राम, हनुमान नगर येथे विविध पारंपारिक खेळांचे सादरीकरण करण्यात आले. या पारंपरिक खेळांमधून तरूणांचे सामर्थ, एकता आणि देशातील विविधतेने नटलेल्या संस्कृतीचे दर्शन घडून आले.

देशातील युवकांना प्रोत्साहित करण्यासाठी स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्ताने दरवर्षी देशात राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. युवकांचा सर्वांगिण विकास, संस्कृती आणि परंपरांचे जतन व्हावे, युवकांच्या सुप्त गुणांना वाव देणे तसेच राष्ट्रीय एकात्मता वाढीस लावणे हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे. यंदा हा मान महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्याला मिळाला असून या ठिकाणी विविध राज्यातून आलेल्या या तरुणांमध्ये राष्ट्रीय एकात्मता, सांप्रदायिक सौहार्दाची भावना, बंधुता, धैर्य आणि साहस यावेळी पाहावयास मिळाले. या महोत्सवात आयोजित करण्यात आलेल्या विविध उपक्रमांना तरूणांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

तिसऱ्या दिवशी पारंपरिक खेळांचे सादरीकरण

आज युवा महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी महाराष्ट्रातील – मल्लखांब, झारखंड – आर्चरी/ तिरंदाजी/धनुर्विद्या, आसाम – खोमलाईनाय/ बोडो रेसलिंग, तामिळनाडू – सिलंबम, पंजाब- गटका, तेलंगणा- कबड्डी, केरळ- कोलकली, कलारीपयट्टू अशा विविध पारंपारिक खेळांचे आज सादरीकरण करण्यात आले. यावेळी तरूणांचा उत्साह आणि मिळणाऱ्या प्रतिसादामुळे 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवातून भारतातील युवा शक्तीला ‘विकसित भारत @2047’  संकल्पना साकार करण्याची नक्कीच प्रेरणा मिळेल.

तसेच आजच्या तिसऱ्या दिवशी साहसी क्रीडा म्हणजेच गिर्यारोहण या प्रकारासाठी साधारणपणे पाचशे ते सहाशे विद्यार्थ्यांनी भेट दिली. यामधील 172 तरुणांनी एक दिवसाच्या गिर्यारोहण प्रशिक्षणाचा लाभ घेतला, यावेळी त्यांना प्रमाणपत्रही देण्यात आले.

या कार्यक्रमाच्यावेळी यवतमाळचे जिल्हा युवा अधिकारी सारंग मेश्राम, राज्यस्थान राज्यातील पाली जिल्ह्याचे जिल्हा युवा अधिकारी राजेंद्र जाखड़ तसेच तालुका क्रीडा अधिकारी श्री. देशपांडे तसेच इंडियन माऊंटेनेरिंग फाउंडेशनचे सदस्य तथा पश्चिम विभागाचे सचिव श्रीकृष्ण कडूसकर यावेळी उपस्थित होते.

000