लातूर-बार्शी-टेंभूर्णी महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाला गती द्या – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

मुंबई, दि.२ :- नांदेड, लातूर, धाराशिव, बीड या जिल्ह्यांसह तेलंगणा व कर्नाटक राज्यातून मोठ्या प्रमाणावर येणारी वाहने, सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांसाठी ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये झालेली वाढ, त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी लातूर-बार्शी-टेंभूर्णी राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाला गती देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात आयोजित बैठकीत दिले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात लातूर-बार्शी-टेंभूर्णी राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामांचा आढावा घेतला. बैठकीस सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, क्रीडामंत्री संजय बनसोडे, आमदार विक्रम काळे, सतीश चव्हाण, संजय शिंदे, मुख्य सचिव नितीन करीर, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे मुख्य अभियंता संतोष शेलार यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

महामार्ग चौपदरीकरण कामाचा आढावा घेताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यास जोडणाऱ्या लातूर-मुरुड-येडशी-कुसळंब-बार्शी-कुर्डुवाडी-टेंभुर्णी या महामार्गाचा प्रवाशांकडून वापर वाढत आहे. सध्या या रस्त्यावर १५ हजार पॅसेंजर कार युनिट (PCU) इतकी वाहतूक होते. त्या पार्श्वभूमीवर लातूर ते टेंभूर्णी रस्त्याचे चौपदरीकरण तातडीने होणे आवश्यक आहे. या मार्गासाठी २८२ हेक्टर भूसंपादन करावे लागणार आहे, त्यातील १४ हेक्टर जमीन वनविभागाची आहे. भूसंपादनाच्या समावेशासह केंद्रीय महामार्ग मंत्रालयाकडे पाठविण्यात आलेला महामार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल मंजूर करून घेण्यासाठी पाठपुरावा करावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले की, येणाऱ्या पावसाळ्याअगोदर महामार्गाशी संबंधित सर्व यंत्रणांनी तातडीची कामे पूर्ण करून घ्यावीत. त्यासाठीच्या सर्व आवश्यक त्या मान्यता तत्परतेने प्राप्त करुन घ्याव्यात. या रस्त्याची उपयुक्तता, सद्यस्थितीतील वाहतूक, स्थानिक लोकप्रतिनिधींची मागणी यांचा मेळ घालून काम करावे. या भागातील साखर कारखान्यांमुळे होत असलेल्या ट्रक, ट्रेलर, हार्वेस्टर या जड वाहतूक साधनांचा विचार करुन त्यादृष्टीने पुलांची उंची ठेवण्यात यावी.

या प्रकल्पाची एकूण लांबी १६१.६४७ कि.मी. इतकी आहे. त्यात टेंभूर्णी जंक्शन ते कुसळंब (७४.८२० कि.मी.), कुसळंब ते येडशी (१९.१७७ कि.मी.) आणि येडशी ते पीव्हीआर चौक लातूर (६७.६५० कि.मी.) या तीन पॅकेजचा समावेश आहे. सध्या टेंभूर्णी ते येडशी दरम्यान डांबर टाकून रुंदीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे. तसेच येडशी ते जावळे, बोरगाव काळे ते मुरुड अकोला यादरम्यान दुपदरीकरणासाठी, तर लातूर विमानतळ जंक्शन ते महिला तंत्रनिकेतन दरम्यान चौपदरीकरणास मंजुरी देण्यात आली आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

——-०००——