‘लुब्रिझोल’च्या बिडकीन येथील प्रकल्पामुळे मराठवाड्याच्या विकासाबरोबरच रोजगार निर्मिती – उद्योगमंत्री उदय सामंत            

मुंबई, दि. ३० : लुब्रिझोल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (एलआयपीएल) या ऑटोमोटिव्ह आणि औद्योगिक वंगणासाठीच्या मिश्रीत प्रणाली क्षेत्रातील अग्रगण्य कंपनीद्वारे छत्रपती संभाजीनगरच्या बिडकीन औद्योगिक क्षेत्रात आधुनिक वंगण आणि इंधन मिश्रीत उत्पादन प्रकल्प उभारला जाणार आहे. सुमारे दोन हजार कोटी रुपये गुंतवणुकीच्या या प्रकल्पामुळे मराठवाड्याच्या विकासाला हातभार लागण्याबरोबरच ९०० जणांना रोजगार उपलब्ध होईल, असा विश्वास उद्योग मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला.

उद्योग विभाग आणि लुब्रिझोल इंडिया प्रायव्हेट लिमिटेडमध्ये आज मंत्री श्री.सामंत यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला. उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे आणि लुब्रिझोल इंडिया मीडल ईस्ट आणि आफ्रिकेच्या व्यवस्थापकीय संचालक भावना बिंद्रा यांनी करारावर स्वाक्षरी केली. एमआयटीएल (ऑरिक) चे व्यवस्थापकीय संचालक पी.डी. मलिकनेर, लुब्रिझोल अ‍ॅडिटीव्हचे अध्यक्ष फ्लाविओ क्लिगर आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी मंत्री श्री.सामंत यांच्या हस्ते बिडकीन परिसरातील 120 एकर जागेचे वाटप पत्र लुब्रिझोल कंपनीस सुपूर्द करण्यात आले.

मंत्री श्री.सामंत म्हणाले की, लुब्रिझोल समूहाने ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमांतर्गत आपली गुंतवणूक वाढवण्याची आणि उत्पादन क्षमता वाढवण्याची योजना आखली आहे. यामुळे छत्रपती संभाजीनगर आणि मराठवाड्याच्या औद्योगिक आणि आर्थिक प्रगतीस हातभार लागेल. त्याचबरोबर रोजगार देखील निर्माण होतील. उद्योग विभाग कंपनीला पूर्ण सहकार्य करेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

लुब्रिझोल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ऑरिक बिडकीन येथे नवीन सिंथेटिक ऑर्गेनिक रासायनिक उत्पादन सुविधा स्थापन करणार आहे. कंपनी दोन टप्प्यांमध्ये सुमारे दोन हजार कोटींची गुंतवणूक करणार असून यामुळे पुढील काही वर्षांत सुमारे 900 व्यक्तींना रोजगार उपलब्ध होईल. प्रस्तावित गुंतवणुकीअंतर्गत ऑरिक बिडकीन येथे 120 एकर जागेत आधुनिक वंगण आणि इंधन मिश्रीत उत्पादन प्रकल्प स्थापन केला जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. लुब्रिझोलचा हा प्रकल्प भारतातील सर्वात मोठा, तर जगातील दुसरा सर्वात मोठा प्रकल्प असेल अशी माहिती लुब्रिझोल इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या भावना बिंद्रा यांनी यावेळी दिली.

000

बी.सी.झंवर/विसंअ