लोकशाही बळकट करण्यासाठी सर्वांनी मतदान करावे – ज्येष्ठ मतदारांचे आवाहन

धुळे लोकसभा मतदार संघ निवडणूक

मालेगाव, दि. १२ (उमाका) : धुळे लोकसभा मतदारसंघासाठी येत्या 20 मे, 2024 रोजी मतदान होणार आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार या निवडणूकीत 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरीक, दिव्यांग मतदार व कोव्हीड-19 रुग्ण मतदार यांना टपाली मतदान पथकामार्फत टपाली मतपत्रिकेद्वारे मतदानाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यानुसार 02-धुळे लोकसभा मतदार संघातंर्गत 114 मालेगाव मध्य मतदारसंघात गृह मतदानाच्या पहिल्या दिवशी एकूण 24 मतदारांनी घरुन आपला मतदानाचा हक्क बजावला, अशी माहिती 114-मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी नितिन सदगीर यांनी दिली आहे.

भारत निवडणूक आयोगाने लोकसभा मतदार संघ निवडणूकीत प्रथमच 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरीक, दिव्यांग मतदार व कोव्हीड-19 रुग्ण मतदार यांना टपाली मतदान पथकामार्फत टपाली मतपत्रिकेद्वारे मतदानाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यानुसार 114 मालेगाव मध्य विधानसभा मतदार संघात एकोणीस (19)  85 वर्षावरील ज्येष्ठ नागरीक तर पाच (5) दिव्यांग असे एकूण 24 मतदारांनी घरुन मतदानासाठी नोंदणी केली आहे. त्यानुसार धुळे लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अभिनव गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली 114 मालेगाव मध्य विधानसभा मतदार संघात आज (11 मे) रोजी गृहभेटीद्वारे टपाली मतदान करण्याचा दिवस निश्चित करण्यात आला होता. त्याअनुषंगाने सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी नितिन सदगीर यांनी संपूर्ण मतदार संघात 4 टीमची नियुक्ती केली होती. प्रत्येक टीममध्ये चार अधिकारी, कर्मचारी यांचा समावेश असून या टीमने मतदारांच्या घरी जाऊन त्यांचे मतदान नोंदवून घेतले आहेत.

धुळे लोकसभा मतदारसंघातंर्गत आज 114 मालेगाव मध्य मतदारसंघात एकूण 24 ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग मतदारांनी गृह मतदान नोंदविले आहेत. तसेच  गृहभेटीद्वारे मतदान केलेल्या ज्येष्ठ नागरीक, दिव्यांग यांनी आज आपला मतदानाचा हक्क बजविल्यानंतर आयोगाने गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करुन दिल्याबद्दल आयोगाचे आभार मानून देशाची लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी ज्याप्रमाणे आम्ही मतदान केले त्याचप्रमाणे सर्व मतदारांनी आपला  मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन केले.

०००