मुंबई, दि. 20 : लोणारी समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याबाबत शासन सकारात्मक आहे. याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळात मान्यतेसाठी लवकरच ठेवण्यात येईल, अशी ग्वाही इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी दिली.
लोणारी समाजाच्या विविध मागण्यांवर चर्चा करण्यासाठी मंत्रालयात मंत्री श्री. सावे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीस आमदार गोपीचंद पडळकर, आमदार जयकुमार गोरे, इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल व अखिल भारतीय लोणारी समाज संघटनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
लोणारी समाजातील बांधवाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याबाबत शासन सकारात्मक आहे. या अनुषंगाने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. आर्थिक विकास महामंडळासोबत लोणारी समाजाच्या मुला-मुलींसाठी नवी मुंबई किंवा पुण्यामध्ये वसतिगृह सुरू करावे, लोणारी समाजाचे विष्णूपंत दादरे यांचे सांगोला तालुक्यात स्मारक उभारण्याची मागणी यावेळी करण्यात आली. समाजाच्या इतर विविध मागण्यांबाबत शासन सकारात्मक असल्याचे मंत्री श्री. सावे यांनी यावेळी सांगितले.
रामोशी, वडार, गुरव, लिंगायत, नाभिक, सुतार, विणकर या समाजासाठी महामंडळ स्थापन करण्यात आले असून लोणारी समाजासाठीचे महामंडळ लवकरच होईल. राज्यातील इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृहे सुरू केली असून या वसतिगृहाचा तसेच ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचाही लाभ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे मंत्री श्री. सावे यांनी यावेळी सांगितले.
0000
शैलजा पाटील/विसंअ