नागपूर येथे राज्यस्तरीय हातमाग पुरस्काराचे शानदार वितरण
नागपूर,दि.९: अत्यंत आव्हानांना सामोरे जात आपल्या पिढ्यानपिढ्यापासून चालत आलेल्या कलेला जीवंत ठेवण्यासमवेत त्यात आपल्या कौशल्यातून भर टाकणाऱ्या हातमाग विणकरांचे योगदान अनेक पुरस्कारांपेक्षाही मोठे आहे. वयाच्या साठ वर्षापर्यंत कार्यरत असलेल्या हातमाग विणकरांना त्यांच्या योगदानाप्रती वार्धक्यातील शिदोरी म्हणून पेन्शन देण्याचा लवकरच निर्णय आम्ही घेत असल्याचे सूतोवाच वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
राष्ट्रीय हातमागदिनानिमित्त आज येथील नियोजन सभागृहात आयोजित राज्यस्तरीय हातमाग विणकर स्पर्धेतील बक्षीस वितरण सभारंभात ते बोलत होते. या कार्यक्रमात रेशीम संचालनालयाच्या संकेतस्थळाचे उद्घाटनही करण्यात आले. यावेळी वस्त्रोद्योग आयुक्त अविश्यांत पंडा, रेशीम संचालनालयाच्या संचालिका वसुमना पंत व मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्राच्या हातमाग धोरणानुसार जास्तीत जास्त व्यक्तींना यातून रोजगार उपलब्ध व्हावेत यादृष्टीने आपण भर दिला आहे. उत्तम काम करणाऱ्या विणकरांचा गौरव व्हावा, त्यांच्या निर्मितीला चालना मिळावी यासाठी आपण घोंगडीपासून करवत काटी साडी, पैठणी, खण, हिमरु शाल आदी पारंपारिक कलाकौशल्यावर भर दिला आहे. याचबरोबर हातमाग व्यवसायाला लागणारे जे रेशीम आहे त्याचे उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांचाही सन्मान झाला पाहिजे याउद्देशाने आपण तुती लागवडीद्वारे भरघोस उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्यांनाही पुरस्कार देत आहोत, असे वस्त्रोद्योग मंत्री यांनी आपल्या भाषणात सांगितले.
अल्प भू-धारक शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीतून अधिकचे उत्पन्न मिळाले पाहिजे यासाठी शासन विविध पातळीवर प्रयत्न करीत आहे. वस्त्रोद्योग व हातमाग या व्यवसायाला येणारा कच्चा माल हा शेतीतूनच येतो. यात प्रामुख्याने हातमागासाठी वरचेवर मोठ्या प्रमाणात सिल्कची मागणी वाढत आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातून तुती लागवडीद्वारे रेशीम कोषाची निर्मिती करणारे शेतकरी वाढले आहेत. यात त्यांनी आपल्या कष्टातून एकरी लाखो रुपयांचे उत्पन्न घेऊन कृषी क्षेत्रातला नवा मार्ग समृद्ध केल्याचे गौरोद्गार वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकात पाटील यांनी काढले. माझे वडिल केवळ अडीच एकर शेती असल्याने गाव सोडून मुंबईकडे वळले होते. गावी सिंचनाची सुविधा झाल्यामुळे मी आता महानगरातून गावी परतलो, असे ते म्हणाले.
अगदी प्रारंभीच्या काळात भारताने उत्तम वस्त्र निर्मिती केलेली होती. तेव्हाच्या एकूण जागतिक व्यापारात 32 टक्के वाटा हा आपला होता. हातमाग वस्त्र व मसाल्याच्या पदार्थातून आपण निर्यातीवर पकड ठेवली होती. ब्रिटीशांच्या काळात जहाज निर्मितीलाही भारतीयांनी आपले कौशल्य सिध्द करुन दाखविले होते. हे वैभव ब्रिटीशांनी लुटून नेले हे आपण विसरता कामा नये. अशा परिस्थितीत आपण स्वातंत्र्यानंतर आज पुन्हा जागतिक पातळीवर एक भक्कम स्थिती गाठल्याचे त्यांनी सांगितले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शेतकरी, कष्टकरी, विणकरी आणि इतर कारागिरांसाठी अनेक विकासाच्या योजना दिलेल्या आहेत. महाराष्ट्र शासनही अनेक योजना घेऊन विणकरांच्या पाठिशी भक्कमपणे उभे असल्याचे ते म्हणाले. त्यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक वस्त्रोद्योग आयुक्त अविश्यांत पंडा यांनी केले तर वस्त्रोद्योग विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती रेशीम संचालनालयाच्या संचालिका वसुमना पंत यांनी दिली.
असे आहेत विजेते
राष्ट्रीय हातमाग कापड स्पर्धेतील वॅल हँगीग (संत कबीर) या प्रकारात सोलापूर येथील राजेंद्र सुदर्शन अंगम यांनी 50 हजार रुपयांचे प्रथम पारितोषिक मिळाले. पैठणी ब्रोकेट साडी या वाणाच्या प्रकाराला गिराम तालेब कबीर या छत्रपती संभाजीनगरच्या विणकराला 40 हजार रुपयांचे द्वितीय पारितोषिक मिळाले. भंडारा येथील कोसा करवती साडी वाणाच्या प्रकारातील मुरलीधर निनावे या विणकराला 30 हजार रुपयांचे तृतीय पारितोषिक मिळाले.
राज्यस्तरीय पारंपारिक कापड स्पर्धेत गिराम तालेब कबीर या विणकराला पैठणीसाठी प्रथम 20 हजार रुपयांचे, दीपक माहुलकर या येवला येथील विणकराला द्वितीय क्रमांकाचे 15 रुपयांचे तर येवलाच्याच युवराज परदेशी याला तृतीय क्रमांकाचे 10 हजार रुपयांचे पारितोषिक मिळाले. हिमरु शाल प्रकारात छत्रपती संभाजी नगरच्या इमरान कुरेशी यांना 20 हजार रुपयांचे प्रथम, फैसल कुरेशी यांनी 15 हजार रुपयांचे द्वितीय पारितोषिक मिळाले.
करवतीसाठी प्रकारात अनुक्रमे उद्धव निखारे, गंगाधर गोखले, इशिका पौनीकर यांना प्रथम, द्वितीय व तृतीय असे पुरस्कार मिळाले. घोंगडी प्रकारात अक्कलकोट येथील सिद्धम्मा कलमनी, रेव्वंमा सिन्नुर, विजयालक्ष्मी हुलमनी या तिन्ही महिलांनीच अनुक्रमे प्रथम ते तृतीय पुरस्कार मिळविले. खण फॅब्रीक प्रकारात उमरेड येथील कृष्णाजी धकाते, यशवंत बारापात्रे ( नागपूर ) व प्रभाकर निपाने यांनी अनुक्रमे प्रथम ते तृतीय असे पुरस्कार प्राप्त केले. याचबरोबर तुती/टसर लक्षाधीश शेतकऱ्यांना या कार्यक्रमात पुरस्कार बहाल करण्यात आले.
०००