वाहनांना वेग नियंत्रक उपकरण बसविणे बंधनकारक

वाहनधारकांनी विहित कार्यपद्धतीचा अवलंब करुन वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र काढावे; परिवहन विभागाचे आवाहन

मुंबई, दि. १३ : केंद्र सरकारच्या अधिसूचनेनुसार परिवहन संवर्गातील दुचाकी, तीनचाकी, क्वाड्री सायकल, फायर टेंडर्स, रुग्णवाहिका आणि पोलीस विभागाची वाहने वगळून इतर सर्व वाहनांना वेग नियंत्रक उपकरण बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानुसार अशा वाहनांना वेग नियंत्रक बसविण्याची कार्यवाही सुरु करण्यात आलेली आहे. मागील काही दिवसांपासून काही प्रकाराच्या वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र काढतांना वाहनधारकांना अडचणी येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यासर्व तक्रारींचे निवारण करण्याकरिता कार्यपध्दती विहित करण्यात आली आहे, त्याचा अवलंब करावा, असे आवाहन परिवहन विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

कार्यपद्धतीनुसार रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या 2 फेब्रुवारी 2018 च्या पत्रान्वये परिवहन संवर्गातील वाहनांना बसविण्यात येणाऱ्या रेट्रो फिटेड वेग नियंत्रक उपकरणाच्या माहितीचे वाहन प्रणालीशी संलग्नीकरण करण्याच्या सूचना जारी केल्या आहेत.  अशा उपकरणांवर सोळा अंकी युआयडी क्रमांक नमूद करण्याचे बंधनकारक केले आहे.

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या दिनांक 15 एप्रिल 2015 च्या अधिसूचनेनुसार दिनांक 1 ऑक्टोबर 2015 नंतर उत्पादित झालेल्या स्टेज-4 व 6 या मानकांच्या वाहनांमध्ये ईसीयू आधारित इंजिन प्रणाली अस्तित्वात आहे. बऱ्याचशा वाहनांमध्ये वेग नियंत्रक प्रणाली सुध्दा कार्यान्वित आहे. अशा वेग नियंत्रक प्रणाली असलेल्या वाहनांना वेगळे वेग नियंत्रक बसविणे आवश्यक नाही. वाहन 4.0 या संगणकीय अभिलेखावर वेग नियंत्रकाचा तपशील उपलब्ध आहे, अशा वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण करुन देण्याबाबत आवश्यक त्या सूचना सर्व क्षेत्रीय कार्यालयांना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत.

वाहन 4.0 या संगणकीय प्रणालीवर वेग नियंत्रकाचा तपशील उपलब्ध होत नसल्यास अशा वाहनांच्या बाबतीत उत्पादक किवा वितरक यांच्याकडून वाहनातील ईसीयू आधारित इंजिन प्रणालीत वेग नियंत्रक प्रणाली अस्तित्वात असल्याबाबत प्रमाणपत्र प्राप्त करावे. हे प्रमाणपत्र सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी किंवा त्यापेक्षा वरिष्ठ अधिकारी संगणक प्रणालीत त्याप्रमाणे प्रमाणित करुन योग्यता प्रमाणपत्राचे नुतनीकरण करतील.

ज्या वाहनांना ईसीयू आधारित वेग नियंत्रक प्रणाली उत्पादकाकडून देण्यात आलेली नाही. तसेच त्यांना स्वतंत्ररित्या वेग नियंत्रक बसविण्यात आलेले आहे. मात्र अशा उपकरणांवर 16 अंकी युआयडी क्रमांक नमूद करण्यात आलेला नाही आणि  वाहन प्रणालीवर वेग नियंत्रकासंबंधी माहितीही अद्यावत केलेली नाही, अशा प्रकरणात वाहनधारकांनी संबंधित रेट्रोफिटमेंट सेंटर कडून स्थापना प्रमाणपत्र (Installation Certificate) घ्यावे. हे प्रमाणपत्र वाहन 4.0 संगणकीय प्रणालीशी संलग्न करून घ्यावे.

वाहनात बसविण्यात येणाऱ्या वेग नियंत्रकांचे मॉडेलनिहाय मान्यता प्रमाणपत्र व उत्पादन अनुरुप प्रमाणपत्र (Conformity of Production Certificate) उपलब्ध नसल्यास किंवा संपुष्टात आले असल्यास, अशा वाहनधारकांनी मान्यता प्रमाणपत्र व उत्पादन अनुरुप प्रमाणपत्र वैध असणाऱ्या उत्पादकाचे वेग नियंत्रक उपकरण बसविणे आवश्यक आहे, असे आवाहन सहायक परिवहन आयुक्त कैलास कोठावदे यांनी परिपत्रकान्वये केले आहे.

०००

निलेश तायडे/विसंअ/