विधानसभेच्या प्रत्येक मतदारसंघामध्ये असणार महिला, दिव्यांग आणि युवा संचलित मतदान केंद्र

मुंबई, दि. १३ : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यात 20 मे 2024 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत मतदान होणार आहे. या मतदानासाठी जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघातील 26 विधानसभा मतदारसंघात महिला, युवक आणि दिव्यांग कर्मचारी संचलित प्रत्येकी एक मतदान केंद्र असणार आहे. मतदान केंद्र उभारणीची सर्व तयारी आणि नियोजन पूर्ण करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक यंत्रणेमार्फत देण्यात आली आहे.

मुंबई उपनगर जिल्ह्यात विधानसभेचे एकूण 26 मतदारसंघ आहेत. 26- मुंबई उत्तर, 27- मुंबई उत्तर पश्चिम, 28- मुंबई उत्तर पूर्व, 29- मुंबई उत्तर मध्य या लोकसभा मतदारसंघात समाविष्ट आहेत, तर चेंबूर आणि अणुशक्तीनगर या दोन मतदारसंघांचा समावेश मुंबई शहर जिल्ह्यांतर्गत येणाऱ्या लोकसभा मतदारसंघात आहे. या चारही मतदारसंघात सोमवार 20 मे 2024 रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी पूर्ण केली आहे.

मुंबई उपनगर जिल्ह्यात 7,384 एवढ्या मतदान केंद्रांचा समावेश आहे. या मतदान केंद्रांवर मतदारांना मूलभूत सोयीसुविधा पुरविण्यात येणार आहेत. तसेच विधानसभेच्या प्रत्येक मतदारसंघात प्रत्येकी एका मतदान केंद्रांचे संचलन महिला, तरुण आणि दिव्यांग अधिकारी व कर्मचारी करणार असून त्याचे संपूर्ण नियोजन करण्यात आले आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यात महिला अधिकारी व कर्मचारी संचलित एकूण 26, तरुण अधिकारी व कर्मचारी संचलित 26, तर दिव्यांग अधिकारी व कर्मचारी (सक्षम केंद्र) संचलित एकूण 26 मतदान केंद्र असतील, असेही जिल्हा प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.

०००