विधी क्षेत्रात महिलांचा वाढता सहभाग सुदृढ न्यायव्यवस्थेचे द्योतक – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठात मुलींच्या वसतिगृहाचे उद्घाटन

छत्रपती संभाजीनगर दि.१ (जिमाका)- विधी व न्याय क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढतोय ही सकारात्मक बाब असून भारतीय न्याय व्यवस्था अधिक सृदृढ आणि बळकट असल्याचे ते द्योतक आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस यांनी आज येथे केले.

येथील महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या मुलींच्या वसतिगृहाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापिठाच्या मुलींच्या वसतिगृहाच्या इमारतीचे उद्घाटन आज पार पडले. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मंगेश पाटिल, न्यायमूर्ती रविंद्र घुगे महाराष्ट्राचे महा अधिवक्ता डॉ. बिरेंद्र सराफ, विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु प्रा.ए. लक्ष्मीनाथ, कुलसचिव प्रा. धनाजी जाधव, खा. डॉ. भागवत कराड तसेच विधी व न्याय क्षेत्रातील विविध मान्यवर न्यायमूर्ती, कायदेतज्ज्ञ व विधी विद्यापीठाचे अध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते मुलींच्या वसतिगृहाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर आयोजित कार्यक्रमात बोलतांना श्री. फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रातील तीनही विधी विद्यापीठे ही माझ्या कार्यकाळात स्थापन झाली व कार्यान्वितही झाली ही माझ्यासाठी समाधानाची बाब आहे. या सर्व विधी विद्यापीठांच्या जडणघडणीत सर्वोच्च न्यायालयाचे व उच्च न्यायालयाच्या न्यायमुर्तींचे योगदान असून ते या विद्यापीठांमधील घडामोडींवर बारकाईन लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे ही विद्यापीठे प्रभावीपणे कार्यरत आहेत.

श्री. फडणवीस म्हणाले की, उत्तम न्याय व्यवस्थेमुळे गुंतवणूक प्रक्रिया ही कायदेशीररित्या होण्याचा विश्वास असल्यामुळे आपल्या देशात येण्यास गुंतवणूकदार उत्सूक असतात. त्याचेच फलित म्हणून आपण जगातील सर्वोत्कृष्ट अर्थव्यवस्था होण्याकडे वाटचाल करीत आहोत. भारतीयांवर राज्य करण्याच्या हेतूने ब्रिटीशांनी तयार केलेल्या कायद्यांमध्ये बदल केला. त्यामुळे  न्याय प्रक्रियेविषयी विश्वास दृढ झाला. काही असामाजिक तत्त्व अस्थिरता निर्माण करण्याचे काम करीत असतात. मात्र कोणत्याही समस्येचे उत्तर हे भारतीय संविधानात मिळते. अशा तत्त्वांना आळा घालण्यात आपला कायदा हा स्वयंपूर्ण आहे.

श्री. फडणवीस पुढे म्हणाले की, तंत्रज्ञानाने जगण्याच्या प्रत्येक पैलूला व्यापले आहे. कायदा व विधी क्षेत्रही त्याला अपवाद नाही. न्यायदानाची प्रक्रिया ही अधिकाधिक तंत्रस्नेही व लोकाभिमुख करण्यात आपण योग्यदिशेने पावले टाकत आहोत. विधी व न्यायाच्या क्षेत्रात महिलांचा वाढता सहभाग ही सुद्धा एक सकारात्मक बाब आहे. महिलांच्या सहभागाने न्याय व्यवस्था अधिक बळकट आणि सुदृढ आहे, असा विश्वास श्री. फडणवीस यांनी व्यक्त केला. मुलींसाठी वसतिगृह उपलब्ध झाल्याबद्दल त्यांनी विद्यार्थिनींचे अभिनंदन केले व त्यांनी शिस्तीचे पालन करुन विधी क्षेत्रातील ज्ञानार्जन करावे,असे आवाहनही केले.

प्रास्ताविक प्रभारी कुलगुरु  प्रा. ए. लक्ष्मीनाथ यांनी केले. न्या. रविंद्र घुगे, महाअधिवक्ता डॉ. बिरेंद्र सराफ  यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले व विद्यापीठाच्या जडणघडण व प्रगतीविषयक विचार मांडले. कुलसचिव धनाजी जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले.

०००००