विविध कार्यकारी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी प्रयत्नशील – सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील

पुणे, दि. २२ :  विविध कार्यकारी सहकारी पतसंस्था ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना, नागरिकांना पतपुरवठा करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असल्याने या संस्थांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी केले.

शिरूरमधील कान्हूर मेसाई येथे कान्हूर मेसाई विविध सहकारी संस्थेच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन व भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या निधीतून बांधण्यात आलेल्या स्वागत कमानीचे उद्घाटन प्रसंगी श्री. वळसे पाटील बोलत होते. यावेळी सहायक निबंधक अरुण साकोरे, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील, आबा कोकरे, संस्थेचे संचालक, सरपंच अमोल थिटे, ग्रामपंचायत सदस्य, गावातील नागरिक उपस्थित होते.

कान्हूर मेसाई विविध सहकारी संस्थेचे कामकाज अतिशय चांगले होत असून संस्था नफ्यात आहे. संस्थेने स्वतःच्या निधीतून ३४ लाख रुपयांचा निधी नवीन इमारतीसाठी जमा केला असल्याचे सांगून श्री. वळसे पाटील म्हणाले, आज सहकार क्षेत्रात अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण होताना दिसत आहेत. अनेक संस्था चुकीच्या पद्धतीने कामे केल्याने आर्थिक अडचणीत आल्या आहेत. असे प्रकार टाळण्यासाठी संस्थेच्या संचालक मंडळाने पारदर्शक कामे करावीत.

शेतकऱ्यांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून पीक कर्ज, मध्यम मुदतीचे कर्जाचे वाटप होत आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही जुनी बँक आहे. १९९० साली या बँकेच्या साडेतीनशे कोटी ठेवी होत्या त्या आता १२ हजार कोटी रुपयांपर्यंत वाढल्या आहेत. बँकेचे कामकाज अतिशय सुस्थितीत चालले आहे. त्याच धर्तीवर विविध कार्यकारी सहकारी संस्थेचेदेखील कामकाज सुस्थितीत चालणे गरजेचे आहे. ही समाजाची संस्था असल्याने ती टिकली पाहिजे.

केंद्र शासनाने त्यांच्या उद्योग धोरणात १५२ प्रकारचे विविध व्यवसाय करण्याची परवानगी विविध कार्यकारी सहकारी संस्थांना दिली आहे. संस्थानी नागरिकांना कर्ज वाटप करण्याबरोबरच या व्यवसायात उतरुन आर्थिक सक्षम व्हावे,असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

यावेळी मिडगुलवाडी येथील नव महिला उत्पादक गटांनी तयार केलेल्या वस्तूंची श्री. वळसे पाटील यांनी पाहणी केली.