विशाळगड येथील घटनेचा मंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडून आढावा

मुंबई, दि. १९: कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड येथील घटनेमुळे समाजात तेढ निर्माण होऊ नये. या घटनेमुळे अल्पसंख्याक समाजातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण तयार होऊ नये, याची कोल्हापूर जिल्हा व पोलिस प्रशासनाने दक्षता घ्यावी. तसेच विशाळगड घटनेच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शांतता समितीच्या बैठका घेऊन समाजात शांतता व सलोखा निर्माण करावा, अशा सूचना अल्पसंख्याक विकास व औकाफ, पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी आज दिल्या.

Virendra Dhuri DGIPR,Mantralaya

विशाळगड येथील घटना व सद्यपरिस्थितीबाबत मंत्री श्री. सत्तार यांनी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक, कोल्हापूर यांच्याकडून दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे आयोजित बैठकीतून माहिती घेतली. यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी या सूचना दिल्या.

बैठकीस प्रधान सचिव रिचा बागला, वक्फ बोर्डाचे मुख्य अधिकारी श्री. जुनेद, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी श्री. येडगे व पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित (दूरदृश्य संवाद  प्रणालीद्वारे) उपस्थित होते.

मंत्री श्री. सत्तार यांनी सुरवातीस विशाळगड घटनेमुळे मौजे गजापूर येथील मुसलमानवाडीमध्ये झालेल्या घरांच्या व प्रार्थनास्थळाच्या नुकसानीची सविस्तर माहिती घेतली. कोल्हापूर जिल्हाधिकारी श्री. येडगे यांनी सांगितले की, बाधित झालेल्या कुटुंबास तातडीची मदत म्हणून 25-25 हजार रुपये असे 50 हजार रुपये मदत केलेली आहे. आणखी मदतीसाठी 2 कोटी 85 लाख रुपयांचा नुकसान भरपाई प्रस्ताव शासनास पाठविण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक श्री. पंडित यांनी पोलीस विभागामार्फत दोषींवर करण्यात येत असलेल्या कारवाईची माहिती दिली.

मंत्री श्री. सत्तार यांनी सांगितले की, विशाळगड घटनेमुळे वातावरण दूषित होणार नाही याची खबरदारी घ्यावी. समाजकंटकांवर पोलीस विभागाने तातडीने कारवाई करावी. याठिकाणी असलेली घरे, व्यावसायिक दुकाने, प्रार्थनास्थळांच्या नोंदी तपासाव्यात. विशाळगड येथील अतिक्रमणे काढताना लोकांना विश्वासात घेऊन काढावीत, अशा सूचना त्यांनी दिल्या.

०००

एकनाथ पोवार/विसंअ