राज्यातील पहिलेच अत्याधुनिक मॅाड्युलर थिएटर
जिल्हा वार्षिक योजनेमधून १५ कोटींचा खर्च
शस्त्रक्रियेसाठी थिएटरमध्ये रोबो तंत्रज्ञानाचा वापर
यवतमाळ, दि. २१ (जिमाका) : येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नव्याने अत्याधुनिक मॅाड्युलर ऑपरेशन थिएटर तयार करण्यात आले असून या थिएटरचे उद्घाटन आज पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते झाले. जिल्हा वार्षिक योजनेच्या 15 कोटी रुपये निधीतून उभारण्यात आलेले हे राज्यातील पहिलेच सर्व सुविधायुक्त थिएटर आहे. उद्घाटनानंतर पालकमंत्र्यांनी पाहणी केली. सर्व सुविधायुक्त थिएटर पाहतांना आनंद होत असल्याचे ते म्हणाले.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.गिरीश जतकर, अधीक्षक डॉ. सुरेंद्र भुयार, डॉ.रोहिदास चव्हाण, कॅन्सर थेरपी तज्ज्ञ डॉ.आशुतोष गावंडे, डॉ. सुरेंद्र गवार्ले, डॉ.रामेश्वर पवार, डॉ.अनिकेत बुचे, डॉ.विनोद राठोड, डॉ.स्वप्नील मदनकर, डॉ.वल्लभ जाणे, डॉ. विशाल येलके, डॉ. राम टोंगळे आदी उपस्थित होते.
वैद्यकीय महाविद्यालयात नव्याने तयार करण्यात आलेले मॅाड्युलर थिएटर राज्यातील सर्वाधित सुविधायुक्त व अत्याधुनिक साधनांनी सज्ज आहे. या थिएटरमध्ये होणाऱ्या शस्त्रक्रिया लाईव्ह पाहण्याची सुविधा आहे. शस्त्रक्रिया होत असतांना तज्ज्ञांचे शस्त्रक्रियेबाबत मार्गदर्शन उपलब्ध होऊ शकते. विशेष म्हणजे शस्त्रक्रियेचे रेकॅार्डींग करण्याची सोय आहे. अत्याधुनिक सुविधांसह शस्त्रक्रियेसाठी रोबो तंत्रज्ञानाचा वापर याठिकाणी केला जाणार आहे.
पालकमंत्री श्री. राठोड यांनी महाविद्यालयात अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने जिल्हा वार्षिक योजनेतून 15 कोटी रुपयांची तरतूद थिएटरसाठी उपलब्ध करून दिली होती. आज हे थिएटर रुग्णसेवेत दाखल झाले आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी निर्जंतुकीकरणाची प्रवाभी यंत्रणा उभारण्यात आली आहे. उद्घाटनानंतर पालकमंत्री श्री. राठोड यांनी संपुर्ण थिएटरची पाहणी केली.
पोस्ट ग्रॅज्युएट स्कील लॅबचे लोकार्पण
शल्यचिकित्सा पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना शस्त्रक्रीयेचे कौशल्य अधिक उत्तमपणे अंगीकारता यावे, यासाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या 6 कोटी 25 लक्ष रुपये खर्चातून महाविद्यालयात पोष्ट ग्रॅज्युएट स्कील लॅब सुरु करण्यात आली आहे. या लॅबचे उद्घाटन मंत्री श्री. राठोड यांनी केले. लॅबमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्याना विविध प्रकारच्या शल्यचिकित्सा शस्त्रक्रिया करण्याचे आधुनिक प्रशिक्षण प्राप्त होणार आहे.
अत्याधुनिक श्रवणदोष मापक कक्ष
महाविद्यालयात कर्णबधीर रुग्णांचा श्रवणदोष अचूक मोजण्यासाठी अत्याधुनिक श्रवणदोष मापक यंत्र बसविण्यात आले आहे. या कक्षाचे उद्घाटन पालकमंत्र्यांनी केले. खनिज विकास निधीतील 32 लक्ष रुपये खर्च करून हा कक्ष तयार करण्यात आला आहे. कक्षामुळे कमी ऐकू येणाऱ्या रुग्णांची अचूक तपासणी होणार आहे. विशेष म्हणजे कर्णबधीर बालकांसाठी हा कक्ष अधिक उपयुक्त ठरतील.
कर्णबधीर रुग्णांना श्रवण यंत्राचे वाटप
वैद्यकीय महाविद्यालयात श्रवण दोषाच्या उपचारासाठी दाखल रुग्णांना पालकमंत्र्यांनी श्रवण यंत्राचे वाटप केले. खनिज विकास निधीतून सुमारे 250 रुग्णांना मोफत हे यंत्र देण्यात येत आहे. कानाला यंत्र लावल्यानंतर ऐकू येत असल्याने आनंदाचे भाव रुग्णांच्या चेहऱ्यावर दिसून आले.
०००