शहापूर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पामार्फत मतदानाचा टक्का वाढीसाठी जनजागृती

ठाणे,दि. 16 (जिमाका ) – मतदान हे प्रत्येकाचे राष्ट्रीय कर्तव्य असून मतदानाचा अधिकार हा प्रत्येक नागरिकांनी बजावावा. आपले मत अमूल्य असून मतदान करुन आपण आपली लोकशाही बळकट करा.. मतदार राजा जागा हो.. लोकशाहीचा धागा हो.. अशी जनजागृती  शहापूर मधील आदिवासी वाड्या, पाडया, वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन, आदिवासी मुलांमुलींचे शासकीय वसतीगृह, शासकीय/अनुदानित आश्रमशाळांमध्ये करण्यात आली.

१३५ शहापूर (अ.ज.) विधानसभा मतदार संघामध्ये आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने मतदान टक्केवारी वाढविण्याकरीता व्यापक प्रमाणात जनजागृती करणेबाबतचे विविध उपक्रम आले. प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय शहापूर तथा स्वीप नोडल अधिकारी श्री. आर. बी. हिवाळे यांनी, विविध मतदार जनजागृती उपक्रम राबवून मतदान करण्याबाबत आवाहन केले.

दिव्यांग व वृध्द मतदार, नवीन मतदार, विविध सहकारी गृहनिर्माण संस्था तसेच सहा. निबंधक सहकारी संस्था मिरची गल्ली, हॉटेल संघटना शहापूर, शहापूर मार्केट, ता. शहापूर, वैद्यकीय व्यावसायिक, ज्वेलर्स असोसिएशन, ट्युशन क्लासेस व्हीजन अकॅडमी विश्वानंद संकुल पंडीत नाका या ठिकाणी मतदानाबाबत जनजागृती करण्यात आली.

 तसेच सावरोली, कोठारे, सुसरवाडी, दहागावं, पिवळी, टेंभा, शेणवा, डोळखांब, टाकीपठार येथील शासकीय आश्रमशाळा, जिल्हा परिषदेच्या विविध शाळा येथे पायी रॅली उपक्रम राबविण्यात आला असून मतदानाबाबत जनजागृती करण्यात आली आहे. तसेच आईबाबांना पत्र, चर्चासत्र, यांसारखे महत्त्वाचे उपक्रम राबविण्यात आले.

तसेच नाभिक संघटना शहापूर, वकील संघटना आसनगाव रेल्वे स्टेशन, शहापूर बस स्थानक, आशीर्वाद हॉटेल चौक, स्मार्ट पॉईंट, बिकानेर स्वीट मार्ट, नर्सिंग कॉलेज इ. गर्दीच्या ठिकाणी मतदान करण्याबाबत आवाहन करण्यात आले. सापगांव, साखरोली येथील विटभट्टी कामगारांना मतदानाबाबतचे महत्त्व सांगून मतदान करण्याबाबत आवाहन करण्यात आले. मतदारांना त्यांचे नाव मतदार यादीत तपासता यावे व त्यांचे मतदान केंद्राची माहिती व्हावी याकरीता मतदान चिठठ्या बीएलओ मार्फत वाटप करण्यात येतील व मतदानाचे महत्त्व सांगून जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच १७/०५/२०२४ व १८/०५/२०२४ रोजी शाळा व महाविद्यालयांमार्फत पालकांना मतदान करण्याबाबतचे आवाहन करणारे संदेश व्हॉटस अॅप द्वारे पालकांना पाठवून मतदानांबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.

माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा, पेंढरघोळ येथे आदिवासी संस्कृतीचे आदर्श मतदान केंद्र बनविण्यात येत असून तेथे सेल्फी पॉईंटची स्थापना करणे, आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवणा-या विविध वस्तूंची मांडणी करणे, वारली पेंटींग, आदिवासी बोलीभाषेत बॅनर बनविणे, आदिवासी वेशभुषा, आदिवासी पथनाटय बसविणे, मतदान करण्यासाठी येणा-या लोकांना पुष्प देऊन स्वागत करणे इत्यादी कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती एकात्मिक आदिवासी प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी श्री.आर.बी.हिवाळे यांनी दिली.

00000