शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केली रॅलीच्या माध्यमातून मतदान जनजागृती

नाशिक, दिनांक मे, २०२४ (जि. मा. का. वृत्तसेवा) : महाराष्ट्र राज्याच्या 65 व्या स्थापना दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमानंतर जिल्हा प्रशासनामार्फत आयोजित करण्यात आलेल्या मतदान जनजागृती रॅलीला शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांना राष्ट्रीय मतदानाची शपथ दिल्यानंतर पोलीस कवायत मैदान येथूल रॅलीस प्रारंभ झाला.

मतदान जनजागृती रॅलीत आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, नाशिक महानगरपालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, जिल्हा पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तथा स्वीपच्या नोडल अधिकारी आशिमा मित्तल, नाशिक महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) अनुप यादव, तहसिलदार मंजुषा घाटगे यांच्यासह महाराष्ट्र पोलीस ॲकेडमीचे प्रशिक्षणार्थी, महानगरपालिका शाळांतील विद्यार्थी, सर्व यंत्रणांचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

या रॅलीत वोट कर नाशिककर, मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो, वोट की किंमत कभी ना लेंगे लेकिन वोट जरूर करेंगे, आपल्या मतदानाचा अभिमान, लोकशाहीची आहे शान, सर्वांची आहे ही जबाबदारी, वोट करणार हर नरनारी, सोडा सर्व कामधाम वोट करणे हे पहिले काम, निर्भय होवून मतदान करा, अधिकाराचा सन्मान करा अशा विविध जागृतीपर घोषणा देण्यात आल्या.

पोलीस कवायत मैदानापासून मार्गस्थ होऊन, मध्यवर्ती बस स्थानक चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक येथे मतदान जनजागृती रॅलीची सांगता झाली. जिल्हाधिकारी कार्यालाच्या आवारात महानगरपालिका शाळा क्रमांक १८ आनंदवली येथील विद्यार्थिंनींनी मतदार जनजागृतीपर पथनाट्याचे सादरीकरण केले. यावेळी उपस्थित अधिकारी, कर्मचारी, नागरिकांनी सेल्फी पॉइंटवर सेल्फी काढली.

000