शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी दोन दिवस राखीव – मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई, दि. १६ : वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या अधिपत्याखालील शासकीय वैद्यकीय,दंत महाविद्यालय व रुग्णालयांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी विशेष उपाययोजना राबविण्यात येणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण, विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ज्येष्ठ नागरिकांच्या प्रलंबित मागण्यांबाबत बैठक झाली. बैठकीमध्ये राज्यातील सर्व ज्येष्ठ नागरिकांना सर्वंकष आरोग्य सुविधा पुरविण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. या अनुषंगाने वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे आयुक्त यांनीही सर्व शासकीय अधिष्ठातांना अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.यासंदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या अख्यत्यारितील सर्व वैद्यकीय, दंत, अतिविशेषोपचार महाविद्यालये रुग्णालयांमार्फत ६० वर्षावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांची वर्षातून दोन वेळस मोफत आरोग्य चाचणी, तपासणी करण्यात यावी. ही आरोग्य तपासणीची नोंद आभा कार्ड, एच. एम. आय. एस. प्रणालीमध्ये घेतली जाईल.

ज्येष्ठ नागरिकांनी राज्यातील १.५० कोटी संख्या विचारात घेता सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या तपासणीसाठी डॉक्टर व संबंधित चाचणी, तपासण्यांकरीता आठवड्यातील दोन दिवस राखीव ठेवण्यात येतील. सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या वैद्यकीय तपासणीत दुर्दैवाने काही आजार आढळून आल्यास त्यावर महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या अटी व शर्ती अनुसार उपचार करण्यात यावेत,

सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ज्येष्ठ नागरिकांना आभा कार्ड उपलब्ध करुन देण्याची सुविधा असावी. अशा सूचना देण्यात आल्या असल्याचे मंत्री श्री. मुश्रीफ यांनी सांगितले.

00000

राजू धोत्रे/विसंअ