भोकर तालुक्यामध्ये पालकमंत्र्यांच्या हस्ते ९२७ कोटींच्या विविध प्रकल्पाचे भूमिपूजन व लोकार्पण
नांदेड दि. १७ : केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना विकासासाठी आपल्या पुढ्यात उभ्या आहेत. ज्या लोकप्रतिनिधीमध्ये लोकभावना व ज्यांच्याकडे लोकजागृती, लोकांबद्दल कणव आहे. त्यांच्या मतदारसंघामध्ये विकास धावत असतो. शासनाच्या योजनांच्या अंमलबजावणीवरच विकासाचे आलेख उंचावतात, असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास, पर्यटनमंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी येथे केले.
नांदेड जिल्ह्यातील भोकर येथे जिल्हास्तरीय ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या शुभारंभानंतर राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांच्या सोबत भोकर मतदार संघामध्ये एकाच दिवशी 926.71 कोटी रुपयांच्या विकास कामाच्या भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्यादरम्यान ते बोलत होते.
राज्याचे माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांच्या कामाच्या पद्धतीमध्ये पाठपुराव्याला प्रचंड महत्त्व आहे. त्यामुळे भोकरसारख्या शहरात आज मोठमोठे प्रकल्प उभे राहत असून राज्य शासनाच्या, केंद्र सरकारच्या सर्व योजनांची योग्य अंमलबजावणी सुरू आहे. जो समाज, जो समाज घटक आणि जे नेतृत्व उपलब्ध योजनांचा योग्य वापर करेल त्यांच्या विकासाचा आलेख कायम उंच राहतो असेही, त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
नांदेड जिल्ह्यातील भोकर येथे आज नगरपरिषदेच्या अंतर्गत श्री संत सेवालाल महाराज यांच्या स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले. सात कोटी खर्च करून हे स्मारक उभारले जाणार आहे. त्यानंतर उपस्थित मान्यवरांना संबोधित करताना त्यांनी सरकारच्या सर्व योजना समाजाच्या उन्नतीसाठी वापरणे आणि त्या योग्य प्रकारे वापरल्या जात आहे अथवा नाही याची खातरजमा करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमाला पालकमंत्र्यासह माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण, खासदार डॉ.अजित गोपछडे, आमदार राजेश पवार, आमदार डॉ. तुषार राठोड, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल, अतिरिक्त जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, माजी आमदार अमर राजूरकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मंगाराणी अंबुलगेकर, श्रीजया चव्हाण, रोहिदास जाधव, अॅड. रामराव नाईक विनोद चीदगीरीकर धर्मगुरू महंत बाबुसिंगजी महाराज (संस्थान पोहरादेवी), दीक्षागुरु संत प्रेमसिंगजी महाराज (संस्थान माहूर व कोतापल्ली), श्री संत सेवालाल महाराज समितीचे अध्यक्ष डॉ. यु. एल. जाधव यांच्यासह बंजारा समाजातील समाजभूषण, ज्येष्ठ नेते, तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
यावेळी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांनी देखील संबोधित केले. भोकरचा अनुशेष पूर्ण केला जाईल. विकास कामांसाठी निधी कमी पडणार नाही. याची काळजी घेतली जाईल असे आश्वासन दिले. अन्य मान्यवरांचेही यावेळी मार्गदर्शन झाले.
तत्पूर्वी आज दिवसभरात 926.71 कोटी रूपयांच्या विकास कामांचे उद्घाटन झाले. यामध्ये प्रामुख्याने पिंपळढव साठवण तलाव आणि रेणापूर-सुधा बृहद लघुपाटबंधारे प्रकल्पाची उंची वाढविण्याच्या कामाचा उल्लेख करावा लागेल. या प्रकल्पांमुळे भोकर तालुक्याच्या सिंचन क्षमतेत वाढ होणार असून, भोकर शहरासह अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.
तत्पूर्वी आज सकाळी 10 वाजता शासकीय विश्रामगृह भोकर येथे अस्तित्वातील विश्रामगृहावर समस्थर विस्तारीकरण करण्याच्या 6 कोटी 87 लाख रुपयाचे कामाचे लोकार्पण झाले. भोकर विश्रामगृहाचे रूप यामुळे पालटले आहे.
त्यानंतर माझी लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम झाला. त्यानंतर नांदा म.प. भोकर येथे जिल्ह्याच्या भोकर तालुक्यातील राज्यमार्ग 251 धावरी-थेरबन-सोमठाणा-किनी-पाळज-दिवशी लगळुद राममा तुराटी-बोथी-बितनाळ-सोमठाणा-गोरठा-जामगाव-कुदळा-बोळसा-भायेगाव-अंतरगाव-सावरखेडा-कृष्णूर रामा-419 रस्त्याची हुडको अंतर्गत सुधारणा करण्याच्या व. कि.मी.0/00 ते 42/200 असे 550 कोटी रुपयांचे कामाचे भूमिपूजन झाले.
त्यानंतर परिसरातील शेतकरी व मान्यवरांच्या उपस्थितीत पिंपळढव साठवण तलाव ता. भोकर जि. नांदेड माती धरण सांडवा मुख्य विमोचक व मुख्य कालव्याचे काम व रेणापुर सुधा प्रकल्प बृ.ल.पा.प्रकल्पाची उंची वाढविण्याच्या येथे 116 कोटी 48 लाख रुपयाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
त्यानंतर हायब्रिड ॲन्युईटी कार्यक्रम टप्पा-2 ND –II 33 बी पिंपळढव, बल्लाळ तांडा, मोघाळी कामणगाव एमडीआर 97 किमी 0/000 ते 20/000 ता. भोकर जि. नांदेड रस्त्याची सुधारणा, भोकर येथील सा.बां. विभागीय कार्यालय इमारतीचे बांधकाम , उपविभागीय कार्यालय व तहसिल कार्यालय भोकर येथील महसूल अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी निवासस्थानांचे बांधकाम ,भोकर येथील 30 खाटाच्या रुग्णालयाचे 100 खाटाच्या उपजिल्हा रुग्णालय श्रेणीवर्धन अंतर्गत निवासस्थानाचे बांधकाम. भोकर शहरातील गावतलावाचे पुर्नरुज्जीवन व सुशोभिकरण. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, भोकर येथील प्रशासकीय इमारतीचे बांधकाम, नगरपरिषद, भोकर अंतर्गत बालाजी मंदिर ते बोरगाव रस्त्याची सुधारणा, भोकर शहरासाठी वळण मार्गावरील बांधकामाचे लोकार्पण करण्यात आले.
०००