श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा कलावंत हरपला – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अमीन सयानी यांना श्रद्धांजली

मुंबई, दि. २१ : ज्येष्ठ रेडीओ निवेदक अमीन सयानी यांच्या निधनाने आपल्या आवाजाने श्रोत्यांच्या मनावर अधिराज्यकरणारा कलावंत हरपला, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

उपमुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस आपल्या शोकसंदेशात म्हणतात, आमची पिढी ही रेडीओवरील अमीन सयानी यांचा आवाज ऐकतच मोठी झाली. त्यांच्या बिनाका गीतमाला या कार्यक्रमाने अनेक विक्रम रचले. या गीतमालेतील गाण्यांबरोबरच अमीन सयानी यांचा आवाज ऐकण्यासाठी रसिक आतुरतेने या कार्यक्रमाची वाट पहात असत.  त्यांनी अनेकांना आपल्या आवाजाचा वापर कसा करावा याचेही मार्गदर्शन केले. त्यांच्या आवाजामुळे, त्यांच्या निवेदनाच्या शैलीमुळे अनेकांनी आपल्या निवेदनात बदल केले. त्यांच्या निवेदनाची शैली असलेली निवेदकांची एक पिढी तयार झाली. भाषेवर प्रेम करायला त्यांनी शिकविले. त्यांच्या निधनाने एक थोर निवेदक गमावला आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. हे दुःख सहन करण्याची ताकद कुटुंबियांना मिळो, ही ईश्वरचरणी प्रार्थना!