चंद्रपूर, दि. 6 : नुकत्याच पार पडलेल्या चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने सेल्फी, रिल्स्, पोस्टर्स आणि मिम्स् स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला नागरिकांनी दिलेला उत्स्फुर्त प्रतिसाद, स्वीप टीमची विशेष मेहनत, ‘थिमॅटिक’ मतदान केंद्रासाठी जिल्ह्यातील उद्योजकांनी घेतलेला पुढाकार या सर्व बाबींमुळेच चंद्रपूर जिल्ह्याची मतदार जनजागृतीची ‘स्वीप’ मोहीम प्रभावी ठरली आणि मतदानाची टक्केवारी वाढविण्यास मदत झाली, असे गौरवोद्गार जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी काढले.
नियोजन भवन येथे आज (दि.6) विविध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण करतांना ते बोलत होते. यावेळी मंचावर मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्याम वाखर्डे आदी उपस्थित होते.
सन 2019 च्या तुलनेत यावर्षी 2024 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची मतदानाची टक्केवारी जवळपास 3.5 ने वाढली, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, यासाठी जिल्हा स्वीप नोडल अधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन आणि उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू यांनी अतिशय चांगले नियोजन करून त्याची प्रभावी अंमलबजावणी केली. इतर ठिकाणी मतदानाच्या टक्केवारीमध्ये घट होत असतांनाच चंद्रपूरमध्ये मात्र मतदानाची टक्केवारी वाढली आहे, ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने बुथ स्तरावर जावून राबविलेली विशेष मोहीम, जनजागृतीपर संदेश देण्यासाठी साकारण्यात आलेली मानवी साखळी, मॅरेथॉन, सायकल रॅली, कलापथकांच्या माध्यमातून संदेश याशिवाय मतदानाचा सेल्फी, पोस्टर्स, मिम्स्, रिल्स स्पर्धा आदी उपक्रम राबविले.
पुढे जिल्हाधिकारी म्हणाले, विशेष म्हणजे गत निवडणुकीत चंद्रपूर शहरामध्ये केवळ 53 टक्के मतदान झाले होते. यावर्षी यात 5 टक्क्यांची वाढ होऊन चंद्रपूर शहरात 58 टक्के मतदान झाले. मतदानाच्या माध्यमातूनच लोकांचा आवाज संसदेत पोहचतो. त्यामुळे मतदानाचा हक्क बजावण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष पुढाकार घेतला. उद्योजकांनी सीएसआर निधीमधून स्पर्धेतील विजेत्यांसाठी बाईक, रेसिंग सायकल, मोबाईल अशी आकर्षक बक्षीसे उपलब्ध करून दिली. तसेच जिल्हा प्रशासनाच्या आवाहनावरून मतदारांना आकर्षित करण्यासाठी जिल्हाभरात 85 थिमॅटीक पोलिंग स्टेशन उभारले. यासाठी सर्वजण अभिनंदनास पात्र आहे. येणा-या विधानसभा निवडणुकीतही मतदानाच्या टक्केवारीत नक्कीच वाढ होईल, अशी अपेक्षासुध्दा जिल्हाधिका-यांनी व्यक्त केली.
चंद्रपुरच्या मोहिमेचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडून कौतुक : सीईओ विवेक जॉन्सन
2024 च्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यात जिल्हा प्रशासन यशस्वी ठरले, याचा अभिमान आहे. लोकशाही यशस्वी करण्यासाठी लोकांचा सहभाग असणे आवश्यक आहे. जिल्हाधिकारी यांच्या संकल्पनेतून मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध स्पर्धा तसेच थिमॅटिक मतदान केंद्र हे यावेळेसच्या निवडणुकीचे वैशिष्ट्य ठरले. विशेष म्हणजे चंद्रपुरच्या या उपक्रमाची राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दखल घेऊन कौतुक केले, असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी केले.
पुढील विधानसभेसाठी जबाबदारी वाढली : पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन
जिल्ह्यात स्वीप अंतर्गत राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन. विदर्भात चंद्रपूरमध्ये मतदानाची टक्केवारी वाढली असून पुढेही अशीच संकल्पना राबविण्यात येईल. त्यासाठी आपल्या सर्वांची जबाबदारी वाढली असून यासाठी जिल्हा प्रशासनाला सर्वांचे सहकार्य हवे आहे, असे मत जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्याम वाखर्डे यांनी तर संचालन सावंत चालखुरे यांनी केले.
मतदान केंद्रासमोर सेल्फी क्लिक स्पर्धेतील विजेते : प्रथम पारितोषिक (अपाची मोटरसायकल) सुरेंद्र पोहाणे, द्वितीय पारितोषिक (रेसींग सायकल) प्रशांत गेडाम, तर तृतीय पारितोषिक (ॲन्ड्रॉईड मोबाईल) अशोक बारसागडे यांना मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.
रिल्स स्पर्धा विजेते : प्रथम पारितोषिक (15 हजार रुपये) आशिष बोबडे, द्वितीय पारितोषिक (10 हजार रुपये) मंगेश साखरकर, तृतीय पारितोषिक (5 हजार रुपये) कोमल मडावी.
पोस्टर्स स्पर्धा विजेते : प्रथम पारितोषिक (5 हजार रुपये) प्रथमेश निकोडे, द्वितीय पारितोषिक (3 हजार रुपये) आचल धोंगडे, तृतीय पारितोषिक (2 हजार रुपये) वैष्णवी मिलमिले.
मिम्स स्पर्धा विजेते : प्रथम पारितोषिक (5 हजार रुपये) येवन येलमुले, द्वितीय पारितोषिक (3 हजार रुपये) संजय सोनुने, तृतीय पारितोषिक (2 हजार रुपये) अनुप शाहा.
थिमॅटिक मतदान केंद्राबाबत उद्योजकांचाही सन्मान : थिमॅटिक मतदान केंद्राबाबत प्रथम क्रमांक अल्ट्रा टेक सिमेंट, द्वितीय क्रमांक फेरो ॲलो प्लाँट आणि तृतीय क्रमांक पावरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांना देण्यात आला तसेच यावेळी धारीवाल इन्फ्रास्ट्रक्चर, साई वर्धा पॉवर जनरेशन लिमिटेड, दालमिया सिमेंट कंपनी, बिल्ट बल्लारपूर इंडस्ट्रीज, अरबिंदो कोल माईन्स, सनफ्लॅग आयर्न ॲन्ड स्टील प्राय. लिमि., अंबुजा सिमेंट, माणिकगड सिमेंट आणि चमन मेटॅलिक या उद्योगांनासुध्दा प्रमाणपत्र देण्यात आले.
००००००