सुरक्षेच्या दृष्टीने वाढत्या आव्हानांचा सामना करण्यासाठी गुणात्मक परिवर्तन आवश्यक –उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे, दि. ११: पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाढत्या नागरिकीकरण व औद्योगिकीकरणामुळे निर्माण होणाऱ्या सुरक्षेच्यादृष्टीने वाढत्या आव्हानांचा सामना करण्यासाठी गुणात्मक परिवर्तन आवश्यक आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

पोलीस आयुक्तालय, पुणे शहर अंतर्गत शिवाजीनगर येथे पोलीस मुख्यालयात विविध प्रकल्पांचे भूमीपूजन व शुभारंभ तसेच न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या संगणकीय प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण व मीरा- भाईंदर पोलीस आयुक्तालयांतर्गत पोलीस ठाण्याचे दूरदृश्य प्रणालीद्वारे लोकार्पण कार्यक्रमात उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.

यावेळी केंद्रीय नागरी वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार मेधा कुलकर्णी, आमदार राम शिंदे, उमा खापरे, योगेश टिळेकर, अमित गोरखे, भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, सुनील टिंगरे,  न्यायिक व तांत्रिक पोलीस महासंचालक संजय वर्मा, पोलीस आयुक्त अमितेशकुमार, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे,  महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले तसेच पुणे व पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, पुणे शहर अर्थव्यवस्थेचे ग्रोथ इंजिन म्हणून ओळखले जाते. पुणे शहर हे मॅन्युफॅक्चरिंग, टेक्नॉलॉजी व स्टार्टअप कॅपिटल आहे.  शहराच्या वाढत्या नागरिकीकरण व औद्योगिकीकरणामुळे पोलीस विभागाची आव्हाने बदलली आहेत. त्यामुळे आव्हानांचा सक्षमपणे सामना करण्यासाठी राज्यातील पोलीस विभागाच्या आकृतीबंधामध्ये ६३ वर्षानंतर सर्व निकषांचा विचार करुन २०२३ मध्ये नवीन आकृतीबंध तयार करण्यात आला आहे.

जेथे जेथे आवश्यकता असेल त्या ठिकाणी पोलीस ठाणी निर्माण करण्याचे तसेच आधुनिकीकरणाचे काम सुरु आहे. त्याअंतर्गत पुणे व मिरा- भाईंदर येथील सुमारे ७२० कोटी रुपयांच्या कामांचा आज शुभारंभ व भूमीपूजन होत असल्याचे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, देशामध्ये सर्वात अत्याधुनिक अशा प्रकारचे सायबर सुरक्षा केंद्र हे महाराष्ट्रामध्ये आहे. जवळपास ७५० कोटी रुपये खर्च करून त्याठिकाणी जगातली आधुनिक मशीनरी घेतली आहे. गुन्हेगार तातडीने सापडू शकेल अशी क्षमता आता सायबर केंद्रामध्ये तयार केली आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून सगळ्या कॅमेऱ्यांचे एकीकरण पोलीस विभाग करत आहे. महिला व बालकांविरुद्धचे गुन्हे, आणि ड्रग्ज संदर्भात कुठलीही तडजोड केली जाणार नाही, असे सक्त निर्देश त्यांनी दिले. ड्रग्ज प्रकरणात कुठलाही पोलीस कर्मचारी दोषी आढळल्यास त्याला थेट बडतर्फ करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. ते पुढे म्हणाले, अंधाऱ्या, निर्मनुष्य, दुर्गम भाग, घाट क्षेत्रात सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे, वीज व्यवस्था, नाईट व्हिजन कॅमेरे आदी उपाययोजना करा, अशा सूचना देऊन कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस विभाग जोमाने काम करत आहे, असेही त्यांनी सांगितले.

पोलीस आयुक्त अमितेश कुमार आपल्या प्रास्ताविकात म्हणाले, वाढती लोकसंख्या व वाहनांची संख्या लक्षात घेऊन गुन्हेगारांवर प्रतिबंध ठेवण्यासाठी पुणे शहर आयुक्तालयांतर्गत नवीन ७ पोलीस ठाण्यांची निर्मिती करण्यात आली आहे. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस विभाग जोमाने काम करत असून दुर्गम क्षेत्रात सुरक्षा परिक्षण करण्यात आले आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने विशेष उपाययोजना राबविण्यात येत आहेत. गुन्हे व गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पुणे पोलीस कटिबद्ध आहेत.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त श्री. चौबे म्हणाले, शहराचे वाढते नागरिकीकरण व औद्योगिकीकरण लक्षात घेऊन प्रशासकीय सुलभतेसाठी नवीन परिमंडळास मान्यता मिळाली आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी ताथवडे येथे नवीन जागा मिळाली असून चार नवीन पोलीस ठाण्याला शासनाने मान्यता दिली आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय निश्चितच गुणात्मक बदल घडवून आणेल, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

यावेळी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते पुणे शहर येथील सात नवीन पोलीस ठाण्यांचे उद्घाटन, सीसीटीव्हीच्या दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभ, पुणे पोलीस आयुक्तालयाच्या व बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील नवीन ४ पोलीस ठाण्यांचा शुभारंभ, सायबर पोलीस ठाणे, पीसीसीटी शिल्ड ॲप्लीकेशनचे उद्घाटन करण्यात आले. तसेच न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय, गृहविभाग, मुंबई या संगणकीय प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण व मीरा- भाईंदर पोलीस आयुक्तालयातील नवीन बोईज पोलीस ठाण्याचे व नवीन सहायक पोलीस आयुक्त, तुळींज कार्यालयाचे उद्धाटन करण्यात आले. कार्यक्रमात उपमुख्यमंत्री श्री फडणवीस यांचा पोलीस विभागातर्फे स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

०००

 

The post सुरक्षेच्या दृष्टीने वाढत्या आव्हानांचा सामना करण्यासाठी गुणात्मक परिवर्तन आवश्यक –उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस first appeared on महासंवाद.