स्वच्छता अभियान लोकचळवळ व्हावी -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे,दि.१३ (जिमाका) : सर्वंकष स्वच्छता अभियानांतर्गत संपूर्ण राज्यात स्वच्छता अभियान पूर्ण क्षमतेने राबविण्यात येणार आहे. मात्र हे स्वच्छता अभियान मर्यादित न राहता त्याचे प्रत्यक्ष लोकसहभागातून लोकचळळीत रूपांतर व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाणे येथे केले.

राज्यातील सर्व मंदिरांमध्ये स्वच्छता करा, या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत मुख्यमंत्र्यांनी मंदिराच्या साफसफाईची सुरूवात ठाण्यातील प्राचीन कौपिनेश्वर मंदिरापासून केली, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी आमदार संजय केळकर, माजी महापौर नरेश म्हस्के, माजी नगरसेवक सुधीर कोकाटे, संजय वाघुले, परिवहन सभापती विलास जोशी, महापालिका आयुक्त अभिजीत बांगर, अप्पर पोलीस आयुक्त महेश पाटील आदी या मोहिमेत सहभागी झाले होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी स्वत: हाती झाडू घेवून कौपिनेश्वर मंदिर परिसर स्वच्छ केला त्यांनंतर  मंदिराचा मुख्य सभामंडप व परिसराची पाण्याने साफसफाई केली.

ठाणे शहराच्या मध्यवर्ती असलेल्या ऐतिहासिक अशा कौपिनेश्वर मंदिराच्या साफसफाईला स्वतः सुरुवात करून ते म्हणाले की, मुंबई- ठाणे परिसरात सर्वंकष स्वच्छता मोहीम राबविल्यामुळे या शहरांमधील प्रदूषणाचे प्रमाण निश्चित कमी झाले आहे. केंद्र सरकारने राष्ट्रपती महोदयांच्या हस्ते महाराष्ट्राला स्वच्छतेतील प्रथम क्रमांक देवून गौरविले आहे, ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे.

मुंबई- ठाण्यातील सर्वंकष स्वच्छता अभियानामध्ये सफाई कर्मचाऱ्यांबरोबरच प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी तसेच सर्वसामान्य नागरिक, शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक सहभागी होत असून हे अभियान मर्यादित स्वरूपाचे न राहता त्याचे रूपांतर लोकचळवळीत होणे आवश्यक आहे, यासाठी या अभियानात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

त्याचप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी येत्या २२ जानेवारी रोजी अयोध्येमध्ये होणाऱ्या राम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका हद्दीतील सर्व मंदिरे साफ करुन त्या ठिकाणी विद्युत रोषणाई करण्याच्या सूचना आयुक्त अभिजीत बांगर यांना दिल्या. तसेच टप्याटप्याने राज्यातील सर्व मंदिरांमध्ये स्वच्छता मोहीम हाती घेणार असल्याचेही सांगितले.

ठाणे महानगरपालिकेच्या सर्वंकष स्वच्छता मोहिमेत (Deep Cleaning Campaining) अंतर्गत आज नौपाडा-कोपरी प्रभाग समितीतील सर्व विभागांमध्ये स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली होती. महापालिका आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली ही सर्वंकष स्वच्छता मोहीम सुरू आहे.

०००