हवामानावर आधारीत फळपीक विमा योजना

कृषी क्षेत्राच्या उत्पादन वाढीच्या दरामध्ये फळ पिकांचा प्रमुख सहभाग आहे. फळ पिकांचे बाजारमूल्य अधिक असल्याने शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते. मात्र फळपिकांचे अपेक्षित उत्पन्न न आल्यास येणारा तोटा मोठा असतो. ही बाब विचारात घेऊन शेतकऱ्यांच्या फळपिकांना हवामान धोक्यांपासून संरक्षण देऊन त्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्यासाठी विमा संरक्षणाची गरज आहे.

अमरावती विभागात प्रधानमंत्री पिक विमा योजने अंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना (मृग बहार) सन 2024-25 व 2025-26 या दोन वर्षासाठी राबविण्यास राज्य शासनाने 12 जून 2024 च्या शासन निर्णयानुसार मान्यता दिली आहे. अमरावती विभागात अमरावती, बुलडाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यात मृग बहार 2024 मध्ये संत्रा, मोसंबी, लिंबु, पेरु, डाळिंब, सीताफळ, चिंकू या फळपिकांकरिता अधिसूचित क्षेत्रामध्ये योजना राबविण्यात अनुमती देण्यात आली आहे. या योजनेचा विभागातील अधिकाधिक शेतकरी बांधवांनी लाभ घेण्याचे आवाहन कृषी विभागाद्वारे करण्यात आले आहे.

योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये (मृग बहार) :

ही योजना अधिसूचित केलेल्या क्षेत्रातील अधिसूचित फळपिकांसाठी असून कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. या योजनेत खातेदारांचे व्यतिरिक्त कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी भाग घेण्यास पात्र आहेत. मात्र, भाडेपट्टीने शेती करणारा नोंदणीकृत (रजिस्टर्ड) भाडेकरार पिक विमा संकेस्थळावर अपलोड करणे बंधनकारक आहे. या योजने अंतर्गत केंद्र सरकारने त्यांचे विमा हप्ता अनुदान 30 टक्के दरापर्यत मर्यादित केले आहे. त्यामुळे 30 टक्के वरील विमा हप्ता राज्य शासन व शेतकरी यांनी स्विकारणे क्रमप्राप्त आहे. योजनेंतर्गत 30 ते 35 पर्यंतचे अतिरिक्त 5 टक्के विमा हप्ता दायित्व राज्य शासनाने स्विकारले असून 35 टक्के  वरील विमा हप्ता राज्यशासन व शेतकरी यांनी प्रत्येकी 50:50 टक्के प्रमाणे भरावयाचा आहे. या योजनेत राज्यात प्रति शेतकरी सहभागासाठी कोकण वगळता उर्वरित विभागाकरिता कमीत कमी उत्पादनक्षम क्षेत्र 20 गुंठे (0.20 हे.) ची मर्यादा राहील. तसेच जास्तीत जास्त क्षेत्र मर्यादा ही सर्व फळपिके व दोन्ही हंगाम, मिळेन प्रती शेतकरी 4 हे मर्यादेपर्यत राहील., अधिसुचित फळपिकांपैकी एका फळपिकासाठी एका वर्षांत एकाच क्षेत्रावर मृग अथवा आंबिया बहारापैकी कोणत्याही एकाच हंगामकरिता विमा संरक्षणासाठी अर्ज करता येईल, (उदा. संत्रा, मोसंबी, डाळिंब)

या फळपीक विमा योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांनी ई- पीक पाहणी करणे बंधनकारक आहे. विमा योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी आणि विमा नुकसान भरपाई मिळण्यासाठी शेतकऱ्याचे बँक खाते आधार आधारित पेमेंटसाठी लिंक असावे., केवळ उत्पादनक्षम फळबागांना विमा संरक्षणाचे कवच लाभणार आहे. योजनेत भाग घेण्यासाठी अधिसूचित फळपिकांचे उत्पादनक्षम वय पुढीलप्रमाणे आहे.

फळ पिकांसाठी वय वर्षे :

पेरु फळपिकासाठी तीन वर्षे, चिकुसाठी पाच वर्षे, संत्रा फळपिकासाठी तीन वर्षे, मोसंबीसाठी तीन वर्षे, डाळिंबसाठी दोन वर्षे, लिंबूसाठी चार वर्षे, आंब्यासाठी पाच वर्षे, सिताफळासाठी तीन वर्षे याप्रमाणे फळपिकांचे उत्पादनक्षम वय राहणे आवश्यक राहील.

अमरावती  विभागात पुढीलप्रमाणे कंपन्यांच्या माध्यामातून योजना राबविण्यात येणार :

अमरावती व अकोला जिल्ह्यासाठी युनिव्हर्सल सोम्पो जनरल इनशुरन्स कं.लि. 103 पहिला मजला MAIDC, आकृती स्टार, सेन्ट्रल रोड अधेरी (पूर्व) मुंबई 400093, टोल फ्री क्र. 1800 : 224030 ,

1800 2004030 ई- मेल Contactus@universalsompo.com  ही कंपनी नियुक्ती करण्यात आली आहे.

बुलडाणा व वाशिम  जिल्ह्यासाठी बजाज अलियान्झ जनरल इन्सुरन्स कंपनी लिमिटेड, पुणे क्षेत्रीय कार्यालय 4 था मजला, टोवर नं. 07 कॉमर झोन आय टी पार्क, सम्राट अशोक पथ येरवडा जेल रोड, पुणे 411006, टोल फ्री क्र. 18002095959, ई- मेल bagichelp@bajajallianz.co.in  ही कंपनी नियुक्ती करण्यात आली आहे.

यवतमाळ जिल्ह्यासाठी भारतीय कृषि विमा कंपनी लिमिटेड मुंबई क्षेत्रिय कार्यालय, स्टॉक एक्चेज टॉवर्स, 20 वा मजला, दलाल स्ट्रिट, फोर्ट मुंबई – 400023 टोल फ्री क्र. 18004195004 दुरध्वनी क्र. 022 -61710912 ई- मेल  pikvima@aicofindia.com  ही कंपनी नियुक्ती करण्यात आली आहे.

फळपिकनिहाय विमा संरक्षण प्रकार (हवामान धोके), विमा संरक्षण कालावधी आणि विमा योजनेत भाग घेण्याचा अंतिम दिनांक पुढीलप्रमाणे आहे –

संत्रा, पेरु व लिंबू या फळपिकासाठी कमी पाऊस (15 जून ते 15 जुलै) व पावसाचा खंड व जास्त तापमान (15 जुलै ते 15 ऑगस्ट) या विमा संरक्षण प्रकारात व कालावधीसाठी 25 जून 2024 पर्यंत विमा योजनेत भाग घेता येईल.

मोसंबी या फळपिकासाठी कमी पाऊस (1 जुलै ते 31 जुलै) व पावसाचा खंड व जास्त तापमान (1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट) तसेच चिकु या फळपिकासाठी जास्त आर्द्रता व जास्त पाऊस (1 जुलै ते 30 सप्टेंबर) या विमा संरक्षण प्रकारात व कालावधीसाठी 30 जून पर्यंत विमा योजनेत सहभागी होता येईल.

डाळिंब या फळपिकासाठी पावसाचा खंड (15 जुलै ते 15 ऑक्टोबर) तसेच जास्त पाऊस (16 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर) या विमा संरक्षण प्रकारात व कालावधीसाठी 14 जुलै पर्यंत विमा योजनेत भाग घेता येईल.

सिताफळ या फळपिकासाठी पावसाचा खंड (1 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर) तसेच जास्त पाऊस (1 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर) या विमा संरक्षण प्रकारात व कालावधीसाठी 31 जुलै पर्यंत विमा योजनेत भाग घेता येईल. या विमा योजनेंतर्गत हवामान धोक्याच्या ट्रिगर कार्यान्वित झाल्यास त्या महसूल मंडळातील त्या पिकासाठी भाग घेतलेल्या शेतकऱ्यांस नुकसान भरपाई रक्कम ही संबंधित विमा कंपनीकडून देण्यात येणार आहे.

अमरावती विभागातील जिल्ह्यानिहाय समाविष्ट फळपिके व पिकनिहाय प्रती हेक्टर विमा संरक्षित रक्कम आणि शेतकऱ्याने भरावयाचा विमाहप्ता पुढीलप्रमाणे-

संत्रा या फळपिकासाठी योजनेंतर्गत अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम हे जिल्हे समाविष्ट असून एक लाख रुपये प्रति हेक्टर विमा संरक्षित रक्कम आहे तर 5 हजार रुपये प्रती हेक्टर विमा हप्ता शेतकऱ्याने भरावयाची रक्कम आहे.

मोसंबी या फळपिकासाठी योजनेंतर्गत बुलडाणा, अमरावती, यवतमाळ, अकोला हे जिल्हे समाविष्ट असून एक लाख रुपये प्रति हेक्टर विमा संरक्षित रक्कम आहे तर 5 हजार रुपये प्रती हेक्टर विमा हप्ता शेतकऱ्याने भरावयाची रक्कम आहे.

पेरु या फळपिकासाठी योजनेंतर्गत बुलडाणा, अमरावती, यवतमाळ हे जिल्हे समाविष्ट असून 70 हजार रुपये प्रति हेक्टर विमा संरक्षित रक्कम आहे तर 3 हजार 500  रुपये प्रती हेक्टर विमा हप्ता शेतकऱ्याने भरावयाची रक्कम आहे.

चिकू या फळपिकासाठी योजनेंतर्गत फक्त बुलडाणा जिल्हा समाविष्ट असून 70 हजार रुपये प्रति हेक्टर विमा संरक्षित रक्कम आहे तर 3 हजार 500 रुपये प्रती हेक्टर विमा हप्ता शेतकऱ्याने भरावयाची रक्कम आहे.

लिंबू या फळपिकासाठी योजनेंतर्गत बुलडाणा, वाशिम, अकोला, अमरावती हे जिल्हे समाविष्ट असून 80 हजार रुपये प्रति हेक्टर विमा संरक्षित रक्कम आहे तर 4 हजार रुपये प्रती हेक्टर विमा हप्ता शेतकऱ्याने भरावयाची रक्कम आहे.

डाळिंब या फळपिकासाठी बुलडाणा, वाशिम, अकोला, अमरावती हे जिल्हे समाविष्ट असून 1 लाख 60 हजार रुपये प्रति हेक्टर विमा संरक्षित रक्कम आहे तर 8 हजार रुपये प्रती हेक्टर विमा हप्ता शेतकऱ्याने भरावयाची रक्कम आहे.

सिताफळ या फळपिकासाठी बुलडाणा, वाशिम, अमरावती हे जिल्हे समाविष्ट असून 70 हजार रुपये प्रति हेक्टर विमा संरक्षित रक्कम आहे तर 3 हजार 500 रुपये प्रती हेक्टर विमा हप्ता शेतकऱ्याने भरावयाची रक्कम आहे.

या योजनेत विभागातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी होण्याकरिता आपल्या नजिकच्या बँक शाखेत तसेच आपले सरकार सेवा केंद्रावर विहीत मुदतीत विमा हप्ता भरुन सहभागी व्हावे, असे आवाहन विभागीय कृषि सहसंचालक किसन मुळे यांनी केले आहे. तसेच या योजनेबाबत अधिक माहितीसाठी क्षेत्रीय स्तरावरील मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांच्या कार्यालयाकडे संपर्क साधावा, असेही कृषी विभागाद्वारे कळविण्यात आले आहे

शब्दांकन  : विजय राऊत, सहायक संचालक (माहिती) विभागीय माहिती कार्यालय, अमरावती