२७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सव कार्यक्रम स्थळांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पाहणी

नाशिक, दि. 11 जानेवारी, 2024 (जिमाका वृत्तसेवा) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होत असलेल्या 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या आयोजनाचा आढावा घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तपोवन मैदानावरील सर्व कार्यक्रम स्थळांची पाहणी केली.

 यावेळी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री दादाजी भुसे, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, खासदार हेमंत गोडसे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी जलज शर्मा व इतर प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निलगिरी बाग येथे उभारण्यात आलेल्या हेलिपॅडची पाहणी करून समाधान व्यक्त केले. ‘रोड शो’ चा परिसर व मुख्य कार्यक्रम मंचची पाहणी करून आयोजनात कोणत्याही उणिवा राहणार नाही याची खबरदारी सर्व अधिकाऱ्यांनी घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिले. यावेळी श्री. शिंदे यांनी श्री काळाराम मंदिराची पाहणी करून दर्शन घेतले. तसेच गोदावरी नदी व शहर सुशोभीकरण कामाची पाहणी केली.

0000