शेतकरी आंदोलनाचे १०० दिवस पूर्ण; शेवटच्या श्वासापर्यंत संघर्ष करत राहणार.. लढणार आणि जिंकणार

वादग्रस्त कृषी कायद्याविरोधात दिल्लीतील सीमांवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला आता १०० दिवस पूर्ण झाले आहेत. गतवर्षीच्या डिसेंबर महिन्यापासून शेतकरी कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी आंदोलन करीत आहेत. भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांनी आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व शेतकऱ्यांचे आभार मानले आहेत. यासंदर्भात त्यांनी एक ट्विटही केले आहे.

०६ मार्च २०२१ रोजी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला १०० दिवस पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने काळे झेंडे दाखवणे आणि केएमपी एक्स्प्रेस वे जाम करण्याचा निर्धार शेतकऱ्यांकडून करण्यात आला आहे. शेतकरी आंदोलनाच्या १०० व्या दिवशी सकाळी राकेश टिकैत यांनी एक ट्विट केले आहे. यामध्ये एक फोटो शेअर करण्यात आला असून, शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा दिल्याबाबत सहभागी झालेल्या सर्व शेतकऱ्यांचे आभार मानण्यात आले आहेत.

शेतकरी आंदोलनाचे १०० दिवस.. तोडगा निघेपर्यंत आणि शेवटच्या श्वासापर्यंत संघर्ष करत राहणार.. लढणार आणि जिंकणार, असे ट्विट शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी केले आहे. शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राकेश टिकैत देशभरातील विविध राज्यांच्या दौऱ्यावर जात आहेत. यावेळी स्थानिक पातळीवर आयोजित करण्यात आलेल्या किसान महापंचयातींना संबोधित करून देशभरातून शेतकरी आंदोलनाला अधिकाधिक पाठिंबा मिळावा, यासाठी राकेश टिकैत प्रयत्नशील असल्याचे पाहायला मिळत आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा