‘आर्यन खान ड्रग्जप्रकरण दाबण्यासाठी २५ कोटींची डील, ८ कोटी समीर वानखेडेंना’

मुंबई : आर्यन खान ड्रग्जप्रकरणी धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. या प्रकरणातील साक्षीदार के. पी. गोसावीचा सुरक्षा रक्षक प्रभाकर साईलचा हा व्हिडीओ आहे. त्यानं आर्यन खान प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप केला आहे. यासाठी २५ कोटी रुपयांची डील झाल्याचं या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलंय.

आर्यन खान प्रकरणात दाबण्याचा २५ कोटींपैकी ८ कोटी रुपये एनसीबीचे विभागीय प्रमुख समीर वानखेडे यांना मिळणार असल्याचाही दावा प्रभाकर साईलने या कथित व्हिडीओत केलाय. प्रभाकर साईलने तो के. पी. गोसावीचा सुरक्षा रक्षक असल्याचा दावा केलाय.

या व्हिडीओत प्रभाकर साईल म्हणत आहे, “आम्ही लोवर परेलच्या दिशेने गेलो. तिथं ब्रिजखाली आमची गाडी जाऊन उभी राहिली. पाठिमागून इनोव्हा कार आली. अचानक त्या गाडीमागे निळ्या रंगाची मर्सिडिज आली. मी जाऊन बघितलं तर त्या गाडीत शाहरुख खानची मॅनेजर बसलेली होती. यानंतर के. पी. गोसावी, सॅम आणि पूजा दादलानी या तिघांमध्ये बैठक झाली.”

“या बैठकीत त्यावेळी काय झालं हे मला समजलं नाही. गाडीमधून पुन्हा त्यांनी फोन केला की २५ सांग, शेवटी १८ फायनल कर, कारण त्यातील ८ समीर वानखेडेंना जाणार आहेत. तसेच १० आपल्याला वाटून घ्यायचे आहेत. मी एवढं त्यांचं फोनवरचं संभाषण ऐकलं,” अशी माहिती प्रभाकर साईलने दिली.

समोर आलेल्या या व्हिडीओबाबत चर्चांना उधाण आलंय. या कथित व्हिडीओची खातरजमा होणं अद्याप बाकी आहे. त्यामुळेच याची चौकशी करण्याची मागणी होतं आहे.

महत्वाच्या बातम्या

 

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा