Aam Aadmi Party – वांग ते कांदा शेतकऱ्याचा नुसता वांदा! शेतकऱ्याच्या दुप्पट उत्पन्नाची घोषणा ही चेष्टाच होती – आप

प्रेसनोट । Aam Aadmi Party । आम आदमी पार्टी – गेले काही दिवस कांद्याला भाव (Onion Price ) नसल्यामुळे तो विषय ऐरणीवर आलेला आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्याची स्थिती अत्यंत विदारक झालेली आहे. जागतिक बाजारपेठेत कांद्याची टंचाई असताना देशात मात्र कांद्याला भाव मिळत नाही. शेजारच्या देशामधील आर्थिक संकटामुळे निर्यात मर्यादित होत आहे. शेतकऱ्याला हाताशी किलोमागे एखाद दोन रुपये मिळत आहेत. सरकारच्या उदासीन आणि शेतकरी विरोधी धोरणाचा आम आदमी पार्टीतर्फे आज विधान भवन पुणे येथे निषेध करण्यात आला. तसेच विभागीय आयुक्त व इतर अधिकाऱ्यांना निवेदनासोबत कांदा भेट दिला.

शेतकऱ्याला कांदा असो अथवा वांगी असो भाव मिळत नसल्यामुळे शेतात नांगर फिरवणे, उत्पादन टाकून देणे याशिवाय पर्याय नाही. सरकारच्या एकूणच शेतकरी विरोधी धोरणाचा हा परिणाम आहे. आणि त्यामुळेच २०२२ मध्ये शेतकऱ्याला उत्पन्न दुप्पट होईल असे सांगणाऱ्या भाजप सरकारचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन करीत असल्याचे आप जिल्हा अध्यक्ष मुकुंद किर्दत यांनी सांगितले.

देशांतर्गत महागाई आणि भाव हे योग्य पातळी राहावेत अशा पद्धतीने निर्यात धोरण राबवायला हवे. परंतु सरकार मुख्यत्वे दलाल धार्जिणे धोरण राबवत असल्यामुळे व्यापाऱ्याच्या सोयीचे धोरण अमलात येते आणि यात शेतकरी या कोलमडून पडतो. असे या वेळेस पुरंदर तालुका अध्यक्ष दत्तात्रय कड यांनी सांगितले.

जागतिक बाजारपेठेत कांद्याची टंचाई असताना देशात मात्र कांद्याला भाव मिळत नाही

जानेवारीच्या सुरुवातीला कांद्याला तेराशे पन्नास रुपये क्विंटल हा भाव मिळाला होता परंतु फेब्रुवारी अखेरीस हा भाव 500 रुपये वर आला आहे. त्यामुळे त्याचा उत्पादन खर्च ही निघत नाही . हीच स्थिती वांग्या विषयी सुद्धा आहे. त्यामुळे या पिकाला हमीभाव देणे गरजेचे आहे असे आप चाकण संयोजक संदीप शिंदे यांनी सांगीतले.

शेतकऱ्यांपेक्षा वरचढ असलेली दलालांची साखळी बाजारपेठेतील वाहतूक, साठवणूक व्यवस्था तसेच इतर पायाभूत सुविधांचा अभाव आणि या कृषी उत्पादनांचे नियोजन, नेमका अंदाज घेण्यासाठी ठरणारी यंत्रणा तसेच निर्यात धोरणाचा गैरवापर, शेतकऱ्यांचे अज्ञान या सगळ्यामुळे शेती हा व्यवसाय आतबट्ट्याचा ठरत आहे. असे आम आदमी पार्टीने पंतप्रधान यांचेसाठी विभागीय आयुक्तांकडे दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे.

या वेळेसच्या आंदोलनात आपचे जिल्हा अध्यक्ष मुकुंद किर्दत, पुरंदर तालुका अध्यक्ष दत्तात्रय कड , चाकण संयोजक संदिप शिंदे, दौंड तालुका अध्यक्ष रवींद्र जाधव, संदीप चोंडकर,शहाजी कोलते, निर्मल साबळे, अभिजित वाघमारे, साहिल जवळेकर, शिवाजीनगर आप अध्यक्ष सतिश यादव, जिल्हा सचिव अक्षय शिंदे, आकाश चव्हाण, मुनेश चव्हाण, तन्मय जाधव, आदित्य जाधव, रूद्र ठाकर आदी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या | LATEST MARATHI NEWS | MARATHI BATMYA

You might also like

Comments are closed.