तब्बल १५ वर्षांनंतर अंकुश चौधरीची छोट्या पडद्यावर धडाकेबाज एण्ट्री

मुंबई : मराठी सुपरस्टार अंकुश चौधरीने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळंच स्थान निर्माण केलं आहे. बऱ्याच काळापासून अभिनेता अंकुश चौधरी छोट्या पडद्यापासून दूर झाला होता. मात्र आता तब्बल १५ वर्षांनंतर अंकुश पुन्हा टेलिव्हिजनवर दमदार एण्ट्री घेण्यासाठी सज्ज झाला आहे. स्टार प्रवाह वाहिनीवर २१ ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या ‘मी होणार सुपरस्टार’ या डान्स रिअ‍ॅलिटी शोमध्ये अंकुश सुपर जजची जबाबदारी पार पाडणार आहे.

या ग्रॅण्ड रिअ‍ॅलिटी शोविषयी सांगताना अंकुश म्हणाला, ‘’पंधरा वर्षांनंतर पुन्हा एकदा टेलिव्हिजनकडे वळताना अतिशय आनंद होत आहे. विशेष म्हणजे मी महाराष्ट्राची नंबर वन वाहिनी स्टार प्रवाहसोबत पहिल्यांदाच जोडला जातोय आणि जजची भूमिकाही पहिल्यांदाच पार पाडतोय. डान्स हा माझ्या अतिशय आवडीचा विषय आहे. या शोमध्ये जरी मी जज असलो तरी मी टीव्हीसमोर बसलेल्या प्रेक्षकांच्या प्रतिनिधीची जबाबदारी पार पाडणार आहे. फरक एवढाच असेल की प्रेक्षक या कार्यक्रमाचा आनंद घरबसल्या घेतील आणि मी प्रत्यक्ष घेईन.”

पुढे तो म्हणाला की, ”मी होणार सुपरस्टार हा कार्यक्रम नवी ऊर्जा घेऊन येणार आहे. पुन्हा एकदा तीच उर्मी आणि तोच उत्साह या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनुभवायला मिळेल. त्यामुळे मी या शोसाठी प्रचंड उत्सुक आहे,’ असं तो म्हणाला.

मी होणार सुपरस्टार हा शो २१ ऑगस्टपासून दर शनिवार आणि रविवार रात्री ९ वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा