सत्ता गेल्यानंतर काही लोक गेले पण आता नवीन नेतृत्व तयार झालंय : शरद पवार

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज २२ वा वर्धापन दिन. आज मुंबईतील राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत वर्धापनदिन साजरा करण्यात आला. यावेळी ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने मार्गदर्शन करताना शरद पवार यांनी राष्ट्रवादी पक्ष योग्य मार्गाने चालत असल्याचे म्हणत २०२४ मध्ये आपला पक्ष राष्ट्रीय पक्ष म्हणून उदयास येईल, असा विश्वास व्यक्त केला.

ते म्हणाले, अनेक नेत्यांनी पक्ष काढल्याचे आपण बघितले आहे. देशात अनेक पक्ष बनले, काही टिकले तर काही कधी गायब झाले कळलं नाही. राष्ट्रवादी योग्य दिशेने जात आहे. पक्षातून काही लोक गेले तर नवीन लोक तयार झाले. मात्र राष्ट्रवादीने २२ वर्षांपासून राज्याच्या राजकारणात आपली छाप कायम ठेवली आहे. राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग करून सत्ता स्थापन केली.

आज राष्ट्रवादी पक्ष काम करणारा पक्ष म्हणून ओळखला जातो. राजकारणात सतत काम करत राहाणे गरजेचं आहे. सत्ता ही महत्त्वाची आहेच, लोकांचे प्रश्न सोडावण्यासाठी सत्ता गरजेची आहे. महाविकास आघाडी सरकार ५ वर्ष नुसतं टिकणार नाही तर लोकांसाठी कामही करणार आहे. तीन पक्षाच्या सरकारला लोकांनी स्विकारलं, लोकांच्या याच विश्वासावर हे सरकार उत्तम सुरु आहे, असेही पवार म्हणाले.

सत्ता ही केंद्रीत व्हायला नको. तसं झालं तर ती भ्रष्ट होते. सत्ता ही अधिक लोकांच्या हातात गेली पाहिजे. समाजातील प्रत्येक घटकाला आपण या सत्तेचा भाग असल्याची जाणीव झाली पाहिजे. आज राष्ट्रवादीचा प्रवास बघता, पक्षाने महाराष्ट्रात नेतृत्वाची फळी निर्माण केली आहे. असं देखील शरद पवार यावेळी म्हणाले आहेत. सत्ता गेल्यानंतर काही लोक गेले पण आता नवीन नेतृत्व तयार झालंय, आधी त्यांचं कतृत्व कधी दिसलं नाही पण या आता ते जबाबदारीने आपलं काम करत आहेत. त्यामुळे आता राष्ट्रवादीच्या भविष्याची चिंता नाही अशी भावना शरद पवारांनी व्यक्त केली.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा