Ajit Pawar | अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्याला हेक्टरी पाऊण लाखाची मदत करावी – अजित पवार

गडचिरोली : विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार हे आज विदर्भातील अतिवृष्टी व पूर परिस्थितीच्या पाहणी दौऱ्यावर आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील १२ तालुक्यांपैकी अहेरी, सिरोंचा आणि भामरागड या भागाला अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. अतिवृष्टीमुळे साधारणपणे दहा लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून त्यापैकी गडचिरोली जिल्ह्यातील २५ हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. या भागातील शेतकऱ्यांना सरकारने एसडीआरएफचे निकष बाजूला ठेवून हेक्टरी पाऊण लाखाची मदत द्यावी, बिगर शेतकरी घटकाला आणि गडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे दगावलेल्या १२ व्यक्तींच्या कुटुंबियांनाही राज्य सरकारने भरीव मदत करावी, अशी मागणी अजित पवार यांनी गडचिरोली येथे पत्रकार परिषदेत केली.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी या भागात येऊन पंचनामे करायला सांगितले होते. मात्र अजूनही अनेक भागात पंचनामे पूर्ण झालेले नाहीत. शेतकऱ्यांकडून केवळ आधार कार्ड व नुकसानीचा अर्ज घेण्यात आला आहे. राज्य सरकारने कितीही मदतीचे आश्वासन दिले तरी संपूर्ण पंचनामे झाल्याशिवाय मदत कशी देणार?, असा प्रश्न अजित पवार यांनी उपस्थित केला.

 ओला दुष्काळ जाहीर करावा –

राज्य सरकारने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावा आणि त्यासाठी त्वरित विधिमंडळाचे अधिवेशन घ्यावे, या मागणीचा त्यांनी पुनरुच्चार केला. केवळ दोन व्यक्तींनी मुंबईत बसून राज्य चालवणे आणि सर्व जिल्हांना पालकमंत्री देऊन काम करणे यात मोठा फरक आहे, ही वस्तुस्थिती अजित पवार यांनी माध्यमांपुढे मांडली.

 शेतकरी मोठ्या प्रमाणावर हवालदिल –

अजित पवार म्हणाले “राज्यावर नैसर्गिक संकट आल्यावर सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधी, सर्व राजकीय पक्षाचे खासदार व आमदारांना एकत्र करून काम केल्यास त्याचे रिझल्ट लवकर मिळतात. मात्र दुर्दैवाने आज असे होताना दिसत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. राज्याचा शेतकरी मोठ्या प्रमाणावर हवालदिल झाला आहे. शेतकऱ्याला विजेचं कनेक्शन मिळत नाही, पीक गेले असल्याने त्यांना पीक कर्जाची परतफेड करण्यास अडचणी येतील, अतिवृष्टीमुळे रोपे सडून गेली आहेत, रस्त्यांचे मोठे नुकसान झाले आहे.”

मेडीगड्डा धरणामुळे सिरोंचा तालुका बुडेल अशी स्थिती निर्माण होत असेल तर महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन योग्य तो मार्ग काढण्याची गरज आहे. सीमेवरील राज्याने त्यांच्या भागातील लोकांना मदत करताना शेजारील राज्यास त्रास होणार नाही याची खबरदारी घ्यायला हवी. सांगली जिल्ह्याला ज्याप्रमाणे दरवर्षी फटका बसतो तसाच फटका सिरोंचालाही बसू शकेल. याबाबत साकल्याने विचार करायला हवा, असे ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

महत्वाच्या बातम्या

Comments are closed.