Ajit Pawar | गुवाहाटीला जाऊन सरकार पाडणे म्हणजे चोरवाट ; अजित पवारांचा शिंदे गटाला

Ajit Pawar | शिर्डी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ‘राष्ट्रवादी मंथन वेध भविष्याचा’ या शिबिराला पक्षाचे ज्येष्ठ नेते व विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी संबोधित केले. यावेळी त्यांनी शिंदे सरकारवर टीका देखील केली. मुख्यमंत्रीपदाच्या मोबदल्यात राज्यात येऊ घातलेले चार मोठे प्रकल्प गुजरातला दिले गेले. इथल्या तरुणांना रोजगारापासून वंचित ठेवले गेले, असा आरोप अजित पवार यांनी शिंदे सरकारवर केला आहे.

या प्रकल्पांसाठी दिल्लीला जावून माननीय पंतप्रधान, माननीय संरक्षणमंत्री यांना भेटण्याचं, त्यांच्याकडे मागणी करण्याचं धाडसही राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दाखवू शकत नाहीत. हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. हे शिंदे सरकार जितकं सत्तेवर राहील, तितके अधिक महाराष्ट्राचे, इथल्या जनतेचे नुकसान करत राहतील, ही राज्यातल्या जनतेची लोकभावना आहे, असे अजित पवार म्हणाले.

निवडणुका लांबविणे शिंदे सरकारची गरज-

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका वेळेवर घेणे ही राज्य निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे; हे खरं असलं तरी राज्य शासन आणि न्यायालयांनीही त्याबाबत गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे. कारण राज्य निवडणूक आयोगाला त्यांची जबाबदारी पार पाडण्यासाठी, या सगळ्यांकडून सहकार्याची अपेक्षित असते. मला वाटतं की, निवडणुका लांबविणे ही सध्याच्या शिंदे सरकारची गरज झाली आहे. त्यांना जनाधार नाही. लोकांची सहानुभूती महाविकास आघाडीकडे आहे, हे त्यांना चांगलेच ठाऊक आहे. शिवाय त्यांची चूकही त्यांना उमगली आहे; पण ते जाहीरपणे कबूल करू शकत नाही. सरकारं येतात जातात; निवडणुकीत मतदारांनी विजयी कौल दिल्यावर सरकार येते, ते खरे कर्तृत्व असते. त्यात आनंद असतो किंवा पराभव झाला तरी तोही जनतेचा कौल असतो; पण गुवाहाटीला जाऊन सरकार पाडणे म्हणजे ही चोरवाट आहे, अशा शब्दांत अजित पवार यांनी टीका केली.

शेतकऱ्यांची दिवाळी काळी गेली-

राज्याच्या अनेक जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. महापूर आला. शेतकऱ्यांचं खरीपाचे पिक पूर्णपणे वाहून गेले आहे. पशुधन वाहून गेलं. शेतजमीनी पिकासह खरवडून गेल्या आहेत. येणाऱ्या काही वर्षात या जमीनींचं नुकसान भरुन येणार नाही. लोकांच्या घराचे, दुकानाचे नुकसान झालं आहे. रबी हंगामात पेरणी झालेल्या पिकाचंही नुकसान झालं आहे. शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. कर्जाची परतफेड करणं शक्य नसल्याने, शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. शेतकऱ्यांची यंदाची दिवाळी काळी गेली आहे. राज्यातल्या शेतकऱ्यांना आधार, दिलासा देण्यासाठी, राज्यातल्या अतिवृष्टीग्रस्त भागात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी आपण केली. ओला दुष्काळ जाहीर झाला नाही तर, राज्यातला नुकसानग्रस्त शेतकरी पुन्हा उभा राहू शकणार नाही, हे वास्तव आहे. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करुन, खरीपाचे कर्ज माफ करावे, शेतकऱ्यांना प्रति एकर 50 हजार रुपये मदत करावी, अग्रीमसह शेतकऱ्यांना विमा भरपाई द्यावी, अशी मागणी अजित पवार यांनी केली.

यासंदर्भात, मी दिवाळीआधी मुख्यमंत्री महोदयांची भेट घेऊन पत्र दिलं होतं. त्या मागणीचा अजून विचार झाला नाही, ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना, दिवाळीत दिलासा देण्याची संधी, राज्य सरकारनं गमावली, हे राज्यातल्या शेतकऱ्यांचं आणि १३ कोटी जनतेचं दुर्दैवं असल्याचे अजित पवार म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.