Ajit Pawar | फडणवीसांना आव्हान देणाऱ्या कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना अजित पवारांचं सडेतोड प्रत्युत्तर; म्हणाले,

Ajit Pawar | पुणे : संयुक्त महाराष्ट्र चळवळीनंतर महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं. या घटनेला आता सात दशकांहून जास्त काळ उलटला. मात्र, कर्नाटकसोबत असलेला सीमाप्रश्न अजूनही सुटलेला नाही. त्यात आता सांगलीतील जत तालुक्यातल्या ४० गावांवरही दावा करण्याची तयारी बोम्मई सरकारने केल्याचं समोर आलं आहे.

यावर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) म्हणाले, “महाराष्ट्रातील एकही गाव कोठेही जाणार नाही. आम्ही सर्वोच्च न्यायालयात लढून बेळगाव, कारवार, निपाणी यांच्यासह सर्व गावं मिळवण्याचा प्रयत्न करणार आहोत.” फडणवीसांच्या या वक्तव्यावर बसवराज बोम्मई यांनीं ट्विट करत इशारा दिला. त्यांच्या विधानाला विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे.

“कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून गेल्या दोन दिवसांत जी काही विधानं आली आहेत, त्यांचा आम्ही निषेध आणि धिक्कार करतो. ते काय महाराष्ट्र मागायला निघाले आहेत का? त्यांना काय महाराष्ट्र असा तसा वाटला का? कारण नसताना सांगलीतील जत तालुक्यासंबंधी त्यांनी विधान केलं. आणि आता सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील गावांसदर्भात विधान केलं आहे,” अशा शब्दात अजित पवारांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना सुनावलं आहे.

अजित पवार म्हणाले की “काही संबंध नसताना अशा प्रकारची वक्तव्यं करायची आणि लोकांचं लक्ष विचलित करण्याचा हा प्रयत्न आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी त्यांना कडक शब्दांत समज दिली पाहिजे. शेवटी कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि आपले उपमुख्यमंत्री भाजपाचे आहेत”. याआधी अशी विधानं होताना दिसत नव्हती. आता तर फक्त मुंबईच मागायची राहिली आहे, असा टोलाही त्यांनी यावेळी बोलताना लगावला.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.