Ajit Pawar | “राहुल कलाटेंना आम्ही…”; अपक्ष उमेदवारीवरुन अजित पवारांचं वक्तव्य

Ajit Pawar | पुणे : पुणे शहरातील चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीकडून नाना काटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अर्ज दाखल करण्यासाठी पिंपळे सौदागर येथून थेरगावमधील ग क्षेत्रीय कार्यालयापर्यंत रॅली काढण्यात आली होती. जोरदार शक्ती प्रदर्शन करत महाविकास आघाडीच्या समर्थनार्थ यावेळी घोषणा देण्यात आल्या. यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार, आमदार अण्णा बनसोडे, सुनील शेळके, माजी आमदार विलास लांडे, शहराध्यक्ष अजित गव्हाणे, महिला अध्यक्ष कविता आल्हाट आदि उपस्थित होते. मात्र शिवसेनेचे नेते राहुल कलाटे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

राष्ट्रवादीला शिवसेनेचा पाठिंबा

“पोटनिवडणुकीत चिंचवड जागेसाठी आणि उमेदवार कोण यासाठी मी शेवटपर्यंत चर्चा केली. वेगवेगळे पर्याय दिले पण एकमत झाले नाही. सकाळी सर्वांशी बोललो. त्यानंतर नाना काटे यांच्या नावावर एकमत झाले. ते जाहीर केले. राहुल कलाटे उभे राहणार असले तरी आमचा अजूनही एकमत करण्याचा प्रयत्न आहे. सहानुभूतीचा विषय नाही. तीन निवडणुकामध्ये यांना सहानुभूती दिसली नाही. फक्त मुंबईमध्ये त्यांनी उमेदवार दिला नाही. त्यामुळे ही निवडणूक लढवावी हे सर्वांचे मत होते. यामध्ये उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचा पाठिंबा राहील असे सांगितले आहे. या शहराशी माझा संबंध आहे. माझी राजकीय सुरुवात येथून झाली. त्यावेळी मी देशात पहिल्या क्रमांकाची मते घेतली होती. या शहराचा कायापालट केला. त्यामुळे आमचा विजय निश्चित आहे”, असे अजित पवार म्हणाले आहेत.

“उद्यापर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत”- Ajit Pawar

“दोन जागा होत्या त्यापैकी कसबा मतदारसंघाची जागा महाविकास आघाडीने काँग्रेसला दिली. तर आज आम्ही सर्वांनी नाना काटे यांचा अर्ज दाखल केलेला आहे. उद्या अर्ज छाणणी आहे, त्यानंतर अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. काल रात्री उशीरापर्यंत आम्ही या ठिकाणी उमेदवारीसंदर्भात तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करत होतो. परंतु दुर्दैवाने यावर एकमत झालं नाही. मग सकाळी मी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी बोललो. माझं बाळासाहेब थोरातांशीही बोलणं झालं आणि त्यांना आज आम्ही नाना काटे यांचा अर्ज दाखल करत असल्याचे मी सांगितले”

“आमच्याकडे ज्यांनी उमेदवारी मागितली होती, त्यांनी शांत रहावं म्हणून आम्ही प्रयत्न सुरू ठेवणार आहोत, शेवटी ज्याचा त्याचा प्रश्न असतो. राहुल कलाटेंना भेटायलाही काहीजण गेले होते. परंतु त्यांची काय चर्चा झाली हे मला अद्याप समजले नाही”, असेही अजित पवारांनी सांगितले आहे.

“कलाटेंना सांगण्याचं आम्ही काम करू” (Ajit Pawar Talk about Rahul Kalate)

“राहुल कलाटेंना सांगण्याचं आम्ही काम करू, ऐकायचं नाही ऐकायचं हा त्याचा निर्णय आहे. मला मात्र उद्धव ठाकरेंनी स्पष्टपणे सांगितलं आहे की, आपला महाविकास आघाडीचा उमेदवार नाना काटे यांना शिवसेनेचा स्पष्ट पाठिंबा राहील. एक नक्कीच सांगेन हलक्यात घेतली तर निवडणूक सोपी नाही. परंतु कष्ट घेतले तर निवडणूक अवघडही नाही. या शहराचा अनेक वर्षांपासून संबंध आहे. माझ्या राजकीय जीवनाची सुरुवातच पिंपरी-चिंचवडमधून झाली आहे.”, असे अजित पवारांनी सांगितले आहे.

“पंढरपूरची निवडणूकही लढली गेली, कोल्हापूरची निवडणूकही लढली गेली. देगलूरची निवडणूकही लढली गेली. फक्त अपवाद आहे तो मुंबईचा आणि मुंबईची जी पोटनिवडणूक झाली त्यामध्ये मात्र आवाहन केल्यानंतर प्रमुख पक्षांनी तिथं उमेदवारी दिली नाही. आम्ही आणि शिवसेना, काँग्रेस सर्वांशी चर्चा करत होतो, त्यावेळी असं सर्वांचं मत आलं की ही निवडणूक लढवावी, त्यामुळे आम्ही अर्ज दाखल केलेला आहे.” असंही अजित पवार म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-