Ajit Pawar । “नव्याचे नऊ दिवस असतात मान्य, पण..”; अजित पवारांचा शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा

(Ajit Pawar)  पुणे । एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेतच दोन गट निर्माण झाले. शिंदे गट आणि ठाकरे गट असा वाद सुरु असतानाच दुसरीकडे मात्र विरोधीपक्ष आणि सत्ताधाऱ्यांमध्ये देखील आरोप प्रत्यारोपाची मालिका सुरूच आहे. अशातच आता विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला चांगलच फैलावर घेतलं आहे. पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

सत्ताधाऱ्यांमधील लोकप्रतिनिधींना वागण्याचं तारतम्य राहिलेलं नाही, असं अजित पवार (Ajit Pawar) यावेळी म्हणाले. . “सरकारला १०० पेक्षा जास्त दिवस झाले आहेत. नव्याचे ९ दिवस असतात हे मान्य आहे. पण लोकप्रतनिधींना कशा पद्धतीने वागायचं याचं तारतम्य राहिलेलं नाही. यांचे लोकप्रतिनिधी अधिकाऱ्यांना म्हणतात ‘तुमच्या बापाची पेंड आहे का? किती वाजता आला? तुमची वाट बघायला आम्ही काय तुमच्या बापाचे नोकर आहोत का? कानाखाली आवाज काढल्यानंतर तुम्हाला समजेल’. महाराष्ट्रात ही भाषा? ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. हे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना दिसत नाही का?” अशा शब्दांत अजित पवारांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीसांना परखड सवाल केला आहे.

“सरकारने, मुख्यमंत्र्यांनी या सगळ्यावर लक्ष ठेवलं पाहिजे. यांच्या आमदारांनी तारतम्य ठेवलं पाहिजे. यांच्या लोकप्रतिनिधींना कायदा हातात घेण्याचा अधिकार कुणी दिलेला नाही. याची नोंद सरकारने घेतली पाहिजे”, अशा शब्दांत अजित पवारांनी राज्य सरकारला सुनावलं आहे. यावेळी बोलताना त्यांनी राजन विचारे प्रकरणावर देखील भाष्य केलय.

“ठाण्याचे खासदार राजन विचारे यांच्या जीवाला आणि कुटुंबियांना धोका असल्याची माहिती मला काल मिळाली. तसे पत्र त्यांनी पोलीस महासंचालकांना पाठवले आहे. खरं तर सरकारे येत-जात असतात. लोकप्रतिनिधी असो किंवा सर्वसाधारण व्यक्ती, प्रत्येकाचं संरक्षण करणं ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. त्यामुळे निवडून गेलेल्या एका लोकप्रतिनिधीच्या पत्राची दखल घेण्यात यावी, अशी मी विरोधी पक्षनेता या नात्याने मागणी करत असल्याची प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.

काय आहे प्रकरण?

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे उद्धव ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Shinde-Fadanvis) यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. तसेच राजन विचारे यांनी पोलिस महासंचलकांना पत्र देखील पाठवलं आहे. मला आणि माझ्या कुटुंबांच्या जीविताला धोका निर्माण झाल्यास मुख्यमंत्री आणि फडणवीस जबाबदार असतील आसं म्हणत माझ्या पोलीस सरंक्षणात वाढ करावी, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.