Ambadas Danve | “खुर्चीसाठी उद्धव ठाकरे ओवैसींसोबतही जातील”; बावनकुळेंच्या वक्तव्यावर अंबादास दानवेंचा पलटवार; म्हणाले…

Ambadas Danve | मुंबई : शिवसेना (ठाकरे गट) आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या युतीबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली. सत्तेसाठी उद्या ते ओवैसी यांच्यासोबतही युती करण्यास तयार होतील, असं ते म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे.

“असदुद्दीन ओवैसी आणि भारतीय जनता पार्टीची युती आहे हे बिहार, उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीतून दिसून आलेले आहे. भारतीय जनता पार्टी पक्ष स्वत:ची बी टीम म्हणून ओवैसी यांना वापरत आलेला आहे”, असं म्हणत अंबादास दानवे यांनी भाजपाला सुनावलं आहे.

पुढे ते म्हणाले, “तुम्ही प्रकाश आंबेडकर यांना कमी लेखता. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आहेत. वैचारिक मतभेत असू शकतो. त्यांनी त्या-त्या वेळेस तो केला असेल. आम्हीही त्यांना विरोध केला असेल. मात्र हा विरोध कायम असाच ठेवायचा का. हा विरोध सोडून पुढे काही करायचे नाही का? म्हणूनच उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतला आहे.”

काय म्हणाले होते चंद्रशेखर बावनकुळे?

प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आले आहेत. मात्र या गोष्टीचा उद्धव ठाकरेंना काहीही फायदा होणार नाही. कारण प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी म्हणजे भीम शक्ती नाही तो फक्त एक गट आहे. त्याचबरोबर खुर्ची गेल्यामुळे उद्धव ठाकरे हे अस्वस्थ झाले आहेत. सत्तेसाठी उद्या ते ओवैसी यांच्यासोबतही युती करण्यास तयार होतील, अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली होती. “ही युती झाली तरी ती खूप काळ टिकणार नाही, एक दिवस प्रकाश आंबेडकर कंटाळणार”, असं भाकीतही त्यांनी केलं होतं.

महत्वाच्या बातम्या :