Amol Mitkari | “उशीरा सुचलेले शहाणपण”; राज्यपालांच्या राजीनाम्याच्या निर्णयावरुन अमोल मिटकरींची टीका

Amol Mitkari | मुंबई : राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagtsigh Koshyari) यांना राज्यपाल जबाबदारीतून मुक्त व्हायचे आहे आणि अशी इच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याकडे बोलून दाखवली आहे, असे एक निवेदन राज्यपालांच्यावतीने माध्यमांना पाठविण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच मुंबईत उदघाटनाच्या कार्यक्रमाला आले असताना त्यांच्याजवळ जबाबदारीतून मुक्त करण्याची इच्छा व्यक्त केल्याचे निवेदनात म्हटले आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी राज्यपालांवर सडकून टीका केली आहे.

“महाराष्ट्राच्या जनतेची इच्छा होती की, याआधीच राज्यपालांनी पदमुक्त व्हायला हवे होते. आता महाराष्ट्राचा, मराठी माणसाचा, महापुरुषांचा अपमान करुन झाला आणि आता त्यानंतर उशीरा सुचलेले हे शहाणपण आहे.”, अशी प्रतिक्रिया अमोल मिटकरी यांनी दिली आहे.

“ज्यादिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत उद्घाटनासाठी आले होते, त्यादिवशी राज्यपालांची देहबोली वेगळ्या पद्धतीची जाणवली होती. राज्यपालांनी कधीच महाराष्ट्र सोडून जायला हवे होते. पण यानिमित्ताने ते आता जात असतील तर महाराष्ट्र सुटकेचा निःश्वास सोडेल. दुसरं असं की, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर जर सरकार कोसळले तर त्याअगोदरच आपण काढता पाय घ्यावा, अशी भावना त्यांच्या मनात जागृत झाली असेल”, असेही अमोल मिटकरी म्हणाले आहेत.

“आज स्व. बाळासाहेब ठाकरे, नेताजी सुभाषचंद्र बोस, शहाजी राजे यांच्या जयंतीनिमित्त मी साकडे घालतो की, त्यांना लवकर सदबुद्धी मिळो आणि लवकर महाराष्ट्र सोडून त्यांनी राज्याला मोकळं करावं” असेही अमोल मिटकरी म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या