Andheri East By-Election | ‘सत्ता’प्रिय भाजपने संस्कृतीच्या गप्पा मारु नये! पंढरपूर, देगलूर आणि कोल्हापूरला उमेदवार का दिला?

संदीप कापडे | अंधेरी पूर्व पोटनिवडणूक (Andheri East By-Election) बिनविरोध करण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. उमेदवार मुरजी पटेल (Murji Patel) आता निवडणूक लढवणार नाहीत. महाराष्ट्राच्या वैभवशाली राजकीय संस्कृतीला साजेसा निर्णय घेतल्याचे भाजपचे म्हणणे आहे. यापूर्वी राज्यातील अनेक ठिकाणी जर कुणाचं निधन होतं तेव्हा त्यांच्या परिवारीत कोणी लढलं असेल तर भाजप उमेदवार देत नाही, ही आमची संस्कृती आहे. अटल बिहारी वाजपेयींच्या काळापासून ही आमची संस्कृती आहे, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (BJP State President Chandrasekhar Bawankule) यांनी म्हटले आहे. मात्र काळ्या दगडावरची रेष म्हणजे भाजपचे आणि संस्कृतीचे काही देणे-घेणे नाही. भाजपला फक्त सत्ता पाहीजे. उगाच यांनी अनेक राज्यात ऑपरेशन लोटस यशस्वी केले नाही. भाजप आज संस्कृतीच्या गप्पा करत असले. तर ही संस्कृती पंढरपूर, देगलूर (नांदेड) आणि कोल्हापूरला झालेल्या पोटनिवडणुकीदरम्यान कुठं गेली होती, असा प्रश्न निर्माण होतो.

पंढरपूर मंगळवेढा येथे राष्ट्रवादीचे आमदार भारत भेलके (Bharat Bhalke) यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक झाली. राष्ट्रवादी काँग्रेसची (Nationalist Congress) ही जागा होती. निवडणुकीमध्ये भाजपने उमेदवार दिला होता. भाजपच्या समाधान आवताडेंचा या निवडणुकीत विजय झाला होता. महाविकास आघाडी एकत्र लढली पण त्यांना विजय मिळाला नाही. भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. भारत भालकेंचे चिरंजीव भगीरथ भालके हे राष्ट्रवादीकडून उभे होते तर त्यांच्याविरुद्ध भाजपने समाधान आवताडे यांना उभं केले. तेव्हा भाजपला संस्कृती, परंपरा आठवली नाही का? भाजपकडून देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील मतदार संघात ठाण मांडून बसले होते. तेव्हा भाजपला,परंपरा आणि संस्कृतीचे लक्षात आले नाही का? त्यामुळे अंधेरी पूर्व मधून माघार ही भाजपची संस्कृती नसून पराभवाच्या भितीमुळे ओढवलेली नामुष्की आहे.

भाजपच्या संस्कृतीने माती खाल्ली-

कोल्हापूर पोटनिवडणुकीत देखील भाजपच्या संस्कृतीने माती खाल्ली होती. काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक झाली होती. या निवडणुकीत तर तत्कालिन पालकमंत्री सतेज पाटील आणि चंद्रकांत पाटील आमने-सामने आले होते. भाजपने या निवडणुकीत देखील उमेदावर दिला होता. या निवडणुकीत काँग्रेसकडून चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव (Jayashree Jadhav) यांना उमेदवारी देण्यात आली. तर भाजपने सत्यजीत कदम (Satyajeet Kadam) यांना उमेदवारी दिली होती. मात्र भाजपचा या निवडणुकीत पराभव झाला होता. त्यामुळे भाजपचा खोटारडा चेहारा तोंडावर पडला आहे. भाजपला पराभवाची भिती नसती तर भाजपने अंधेरी पूर्व मधून उमेदवार मागे घेतला नसता. तसेच संस्कृतीच्या गप्पा मारणाऱ्या भाजपने उमेदवारी अर्ज का भरला, असा प्रश्न राजकीय वर्तुळात निर्माण झाला आहे.

२०१९ मध्ये निवडणुकीत देगलूर मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचे रावसाहेब अंतापूरकर यांनी शिवसेनेचे उमेदवार सुभाष साबणे यांचा पराभव केला होता. त्यानंतर आमदार अंतापूरकर यांचं निधन झालं. त्यामुळे आता या मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्यात आली. हा काँग्रसचा मतदार संघ होता. संस्कृती आणि परंपरेप्रमाणे भाजपे इथेही उमेदवार द्यायला नको होता. पण सत्ताप्रिय भाजपने इथे उमेदवार दिला. पोटनिवडणुकीत काँग्रेसने रावसाहेब अंतापूरकर यांचे चिरंजीव जितेश अंतापूरकर यांना उमेदवारी दिली होती. तर सुभाष साबणे यांनी भाजपमध्ये प्रवेश करत भाजपकडून निवडणूक लढवली. मात्र साबणे यांचा जितेश अंतापूरकर यांनी पराभव केला.

रमेश वांजळे यांच्या निधनानंतर रीक्त झालेली जागाही भाजपने सोडली नाही-

खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे मनसेचे आमदार रमेश वांजळे यांचं निधन झालं. त्यावेळी पोटनिवडणूक झाली होती. रमेश वांजळे यांच्या पत्नी हर्षदा वांजळे या राष्ट्रवादी काँग्रेसकडून पोटनिवडणूकीला उभ्या राहिल्या. मनसेने मोठ्या मनाने या ठीकाणी उमेदवार दिला नाही. कारण वांजळे यांचा घरचा सदस्य उभा होता. मात्र भाजपने भीमराव तापकीर यांना उमेदवारी दिली. तापकीर निवडून देखील आले. आताही तेच आमदार आहेत. त्यामुळे भाजपने संस्कृतीच्या गप्पा मारू नये. मारल्या तर खोटे बोलू नये.

भाजपची अचानक माघार का?

उद्धव ठाकरे यांच्याप्रती राज्यात सहानुभूतीची लाट निर्माण झाल्याचे चित्र आहे. आधी भाजपने उमेदवार द्यायला नको होता. पण शिवसेना फोडल्यानंतर देखील भाजप शांत बसला नाही. कारण अंधेरी पूर्व निवडणुकीत भाजपचा विरोधी उमेदवार ऋतुजा लटके नव्हत्या तर उद्धव ठाकरे होते. तसे चित्र देखील निर्माण करण्यात आले होते. स्थानिक मतदारसंघात ऋतुजा लटके यांना सहानुभूती होती तसेच जनतेचा मोठा पाठींबा होता. रमेश लटके यांचे निधन झाल्यानंतर भावनिक दृष्ट्या देखील मतदार लटके परिवारासोबत जोडला गेला. त्यामुळे भाजपचा पराभव निश्चित होता. तसेच भाजपने उमेदवारी दिलेले मुरजी पटेल यांना यापूर्वी देखील अंधेरीच्या जनतेने नाकारले आहे. जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे त्यांचे नगरसेवक पद देखील गेले आहे. स्थानिक पातळीवर देखील भाजपमधून त्यांना विरोध होता. पण पटेल आशिष शेलार यांच्या जवळचे असल्याने त्यांना उमेदवारी देण्यात आली. तसेच या निवडणुकीत पराभव झाला तर आगामी मुंबईसह अन्य महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने भाजपला मोठा फटका बसला असता. शिवसेना फोडल्यानंतर ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे भाजप – शिंदे गटासाठी ही अस्तित्वाची लढाई होती. ही अहंकाराची देखील लढाई होती. मात्र भाजप-शिंदे गाटाने या लढाई न लढता हार पत्करली.

राज ठाकरेंची भाजपशाही?

भाजपने निवडणुकीत पराजय दिसल्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना पत्र लिहायला लावल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. भाजप नेते आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर राज ठाकरे यांनी अंधेरी पूर्व पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहले. यावेळी त्यांनी यापूर्वी झालेल्या पोटनिवडणुकीचे संदर्भ दिले. राज ठाकरे यांच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील पत्रकार परिषद घेत निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केले. मात्र एक प्रश्न असा निर्माण होतो की हे सगळं महापालिकेच्या राजीनाम्यावरुन घोळ झाला तेव्हा का नाही सुचलं?. तेव्हा राज ठाकरे यांनी विरोध का नाही केला. पत्राद्वारे राजीनामा स्विकारण्यासाठी आवाहन का नाही केले. हे सर्व सुडाचे राजकारण आहे. हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित होते. मग राज ठाकरे, शरद पवार तेव्हा गप्प का होते. त्यांनी आवाज का नाही उठवला, असा प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेला पडला आहे.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.