Arvind Sawant | “कोर्टात लाॅजिक नाही फक्त कायदा चालतो”; कोर्टातील युक्तिवादावर अरविंद सावंत यांची प्रतिक्रिया

मुंबई :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंडखोरी केल्यानंतर आता त्यांनी शिवसेनेवर ताबा सांगितला आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात कायदेशीर लढाई सुरू आहे. या लढाईच्या निकालावरच दोन्ही गटांचे अस्तित्व अवलंबून आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी सुनावणी करताना उद्धव गटाला दिलासा दिला आहे. शिंदे गटाच्या अर्जावर तूर्तास कोणताही निर्णय घेऊ नये, असे न्यायालयाने निवडणूक आयोगाला सांगितले. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी सोमवारी होणार आहे. तर यावरच शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया देत शिंदे गटाच्या वालिकांवर टीका केली आहे.

सर्वोच्च न्यायालयात ठाकरे विरुद्ध शिंदे अशा एकूण पाच याचिकांवर सुनावणी सुरु आहे. त्यावर बोलताना अरविंद सावंत म्हणाले कि, “शिंदे गटाचे वकील हरिश साळवे यांनी केलेला युक्तिवाद हा केवळ लॉजिकच्या आधारावर होता. त्यांनी त्यांच्या युक्तिवादात कोणत्याही कायद्याचा उल्लेख केला नाही. तसेच कोणताही संविधानात्मक मुद्दा मांडलेला नाही. त्यांनी फक्त लॉजिक मांडलं आहे. ते लाॅजिक मांडत असताना हे लक्षात आलं आहे की, कोर्टात लाॅजिक चालणार नाहीये तर कायदा चालणार आहे. त्यामुळेच कोर्टाने त्यांना सांगितलं आहे की, आम्ही तुम्हाला 10 दिवस दिले होते, त्या 10 दिवसात तुम्ही काय केलं? मग आता तुम्ही बोलूही नका सरळ निवेदन द्या, त्यामुळे तसं निवेदन आजच कोर्टाला मिळालं आहे. आता पुढील सुनावणी होईल.”

शिवसेना कुणाची? घटनापीठ नेमण्याचे संकेत
सध्या सरन्यायाधीश एन व्ही रमना, न्यायमूर्ती कृष्णा मुरारी आणि हिमा कोहली यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. दरम्यान सोमवारी या प्रकरणात न्यायालय घटनापीठ नेमण्याची शक्यता आहे. न्यायालयाने सर्व पक्षकारांना सुनावणीच्या मुद्यांचे संकलन सादर करण्यास सांगितले होते.

निवडणूक आयोगाचे वकीलही झाले होते सहभागी
आजच्या सुनावणीत महत्त्वाची बाब म्हणजे आज सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या वकिलांनाही पाचारण केले आहे. खरी शिवसेना कोण, हे ठरवण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे का, असा प्रश्न सुनावणीदरम्यान उपस्थित झाला. न्यायमूर्ती म्हणाले की, कोणी आयोगाकडे गेले तर त्याला निर्णय घेण्याचा अधिकार आहे.

महत्वाच्या बातम्या:

महत्वाच्या बातम्या

Comments are closed.