Asia Cup 2022 : आशिया चषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानमध्ये ३ सामने होतील? जाणून घ्या सविस्तर…!

मुंबई : आशिया चषक २०२२ बाबतचे सर्व अडथळे आता दूर झाले आहेत. श्रीलंकेच्या यजमानपदात यूएईमध्ये होणाऱ्या या स्पर्धेचे वेळापत्रक देखील जाहीर करण्यात आले आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक सोशल मीडियावर जाहीर केले होते. या स्पर्धेत महत्वाचं म्हणजे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आशिया चषकादरम्यान या दोन संघांमधील रोमांचक सामन्याची वाट पाहणाऱ्या चाहत्यांना ही लढत तीन वेळा पाहायला मिळू शकते. यंदाच्या आशिया चषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात तीन वेळा आमने-सामने येण्याची स्थिती निर्माण होऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे.

क्रिकेटच्या इतिहासात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढत ही कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून ओळखली जाते. या दोन्ही देशानाच नव्हे तर संपूर्ण जगाला भारत पाकिस्तान सामन्याची ओढ लागलेली असते. जेव्हा-जेव्हा भारत-पाकिस्तान यांच्यात सामना होतो, तेव्हा त्याचा थरार वेगळाच पाहायला मिळतो. मैदानावर दोन्ही संघांची टक्कर पाहण्यासाठी चाहते बऱ्याच काळापासून वाट पाहत आहेत. आयसीसी टी-२० विश्वचषकानंतर पुन्हा एकदा दोन्ही संघांमध्ये चुरशीचा सामना पाहायला मिळणार आहे. तसा अंदाज लावला तर चाहत्यांच्या आनंदात आणखी भर पडणार आहे. कारण स्पर्धेत दोन्ही संघ एक-दोनदा नव्हे तर तीनदा आमनेसामने येण्याची शक्यता आहे.

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांना आशिया चषक स्पर्धेत अ गटात ठेवण्यात आले आहे. त्यामुळे २८ ऑगस्ट रोजी होणार्‍या पहिल्या सामन्यात दोन्ही संघ गट सामन्यात एकमेकांशी भिडतील. अ गटात भारत आणि पाकिस्तान व्यतिरिक्त एक पात्रता संघ असणार आहे. अनपेक्षित उलटफेर न झाल्यास हे दोन्ही बलाढ्य संघ सुपर ४ मध्ये पोहोचतील. यानंतर ४ सप्टेंबर रोजी गटातील दोन्ही अव्वल संघ आमनेसामने असतील जेथे भारत आणि पाकिस्तान यांच्यात पुन्हा एकदा सामना पाहायला मिळेल. यंदाच्या आशिया चषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान स्पर्धा जिंकण्याचे प्रमुख दावेदार मानले जात आहेत. त्यामुळे अंतिम फेरीत ते पुन्हा आमनेसामने येऊ शकतात. जी या स्पर्धेतील त्यांची तिसरी लढत ठरेल.

आशिया चषक संपुर्ण वेळापत्रक 

२७ ऑगस्ट – श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान, दुबई
२८ ऑगस्ट – भारत विरुद्ध पाकिस्तान, दुबई
३० ऑगस्ट – बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान, शारजाह
३१ ऑगस्ट – भारत विरुद्ध पात्रता, दुबई
१ सप्टेंबर – श्रीलंका विरुद्ध बांगलादेश, दुबई
२ सप्टेंबर – पाकिस्तान विरुध्द पात्रता, शारजाह
३ सप्टेंबर – ब १ विरुध्द ब२, शारजाह
४ सप्टेंबर – अ१ विरुध्द अ२, दुबई
६ सप्टेंबर – अ१ विरुध्द ब१, दुबई
७ सप्टेंबर – अ२ विरुध्द ब२, दुबई
८ सप्टेंबर – अ१ विरुध्द ब२, दुबई
९ सप्टेंबर – ब१ विरुध्द अ२, दुबई
१० सप्टेंबर – फायनल, दुबई.

महत्वाच्या बातम्या :

महत्वाच्या बातम्या

Comments are closed.